Pune : तनिषा भिसे यांच्या मृत्यूची ‘माता मृत्यू’ अशी नोंद

पुणे – गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांच्या मृत्यूच्या घटनेची नोंद ‘माता मृत्यू’ अशी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल अलंकार पोलिसांनी मंगळवारी (दि.८) ससून रुग्णालयाकडे सादर केला. या अहवालाची तपासणी केल्यानंतर माता मृत्यू प्रकरणात वैद्यकीय तज्ज्ञांकडून हलगर्जी झाली किंवा नाही, याबाबतचे निरीक्षण नोंदवून पुढील कारवाई केली जाणार आहे.
गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार करण्यात आले नाहीत. त्यानंतर त्यांना बाणेरमधील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. ३१ मार्च रोजी त्यांचे उपचारांदरम्यान निधन झाले. मंगेशकर रुग्णालयाने त्वरित वैद्यकीय सेवा पुरविली नाही, असा आरोप भिसे कुटुंबीयांनी केला होता.
वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून भिसे यांच्या पतीने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने अलंकार पोलिसांनी तपास केला. वैद्यकीय तज्ज्ञ, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. भिसे यांना पहिल्यांदा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले. सूर्या हाॅस्पिटलमध्ये त्यांची प्रसूती झाली. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चार रुग्णालयांतील घटनाक्रमाबाबतचा सविस्तर अहवाल ससून रुग्णालयाला सादर केल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली





