पुणे – महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर परवानगी न घेता विजयी मिरवणूक काढल्याप्रकरणी जनता वसाहत परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक सूरज लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पर्वती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई काटकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१७ जानेवारी) महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. जनता वसाहत परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सूरज लोखंडे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. विजयानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या समर्थकांनी जनता वसाहत परिसरातून मिरवणूक काढली. दरम्यान, निकालानंतर शहरात कोणतीही मिरवणूक काढण्यास स्पष्ट बंदी घालण्यात आली होती. मात्र, पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता तसेच आदेशांचे उल्लंघन करून मिरवणूक काढल्याचा आरोप लोखंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार आदक पुढील तपास करत आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निवडणुकीनंतर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला होता.