Pune : उरूळी देवाची, फुरसुंगी पाणी योजना ताब्यात घ्या; प्राधिकरणाचे पालिकेस पत्र

पुणे : उरूळी देवाची, फुरसुंगी या दोन गावांची पाणी योजना ताब्यात घेण्याचे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने महापालिकेला पाठवले आहे. ही गावे पालिकेतून वगळल्याने त्यांच्या पाणीपुरवठ्याचा तिढा निर्माण झाला आहे. या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाणी योजना राबवली होती. ती चालविण्यासाठी प्राधिकरणाकडे निधी नसल्याने ती ताब्यात घेण्याचे पत्र पालिकेला दिले आहे.
येथील पाणी योजना सुरू झाल्यापासून महापालिकेने ताब्यात घेतलेली नाही. त्यामुळे योजनेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ५० लाख आणि योजनेच्या कामाच्या शेवट हप्ता म्हणून १० कोटी असा साडेदहा कोटींचा निधी देण्याची मागणी प्राधिकरणाने केली असून, महापालिकेने यावर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. यामुळे पाणी योजनेत काही बिघाड झाल्यास गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
काय आहे प्रकरण?
या गावांच्या पाणीपुरवठा योजनेस २०१६ मध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजुरी देण्यात आली. २०१७ मध्ये योजनेचे काम सुरू झाले. काही महिन्यांतच ही गावे पालिकेत आली. निविदेनुसार ठेकेदाराने योजनेचे काम पूर्ण केले असून, १ सप्टेंबर २०२३ पासून पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यानंतर ही योजना पालिकेस हस्तांतरित करण्याची चर्चा सुरू झाली. महापालिकेने याला प्रतिसाद दिला नाही, तरीही योजना एकतर्फी पालिकेकडे हस्तांतरित झाली.
त्यानंतर सरकारने दोन्ही गावे पालिकेतून वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची घोषणा केली. विभागीय आयुक्तांनी एका बैठकीत, नगरपरिषद सुरू होईपर्यंत पालिकेने सुविधा पुरवाव्यात, असे आदेश दिले. मात्र, पालिकेने योजना अद्याप ताब्यात घेतलेली नाही. प्राधिकरण ही एक अंमलबजावणी करणारी यंत्रणा असल्यामुळे २०२३ पासून ठेकेदारच योजनेची देखभाल दुरुस्ती करत आहे. योजनेसाठी प्राधिकरणाकडे वेगळा निधी नाही.
ही गावे पालिकेत असतानाच शासनानेही पुढील निधी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर ठेकेदाराने पाणीपुरवठा, तसेच देखभाल दुरुस्तीचे काम बंद करण्याचा इशारा प्राधिकरणास दिला आहे. त्यामुळे योजना बंद पडण्याची भीती असून, पालिकेने योजना ताब्यात घेऊन तिचे संचालन करावे, असे प्राधिकरणने पालिकेल्या पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.





