Pune : स्वारगेट पीडितेचे प्रधान सचिवांना पत्र

पुणे : स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील पीडितेने प्रधान सचिव विधी व न्याय विभागाला एक पत्र लिहल्याने खळबळ माजली आहे. आरोपीने तीसऱ्यांदा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिने पत्रात म्हटले आहे. तसेच सरकारी वकिल देताना तीला विचारात घेतले गेले नसल्याचा आरोपही केला आहे.
तिने तपासणी करणाऱ्या डॉक्टरांवर आणि पोलिसांवर या पत्रात गंभीर आरोप केले असून, वैद्यकीय तपासणी करण्यासाठी महिला डॉक्टर उपस्थित असणे आवश्यक असताना तपासणी पुरुष डॉक्टरांनीच केली. एवढेच नाही तर पोलिसांनीही चौकशी करताना महिला पोलिसांना बरोबर घेतले नाही. त्यामुळे पुरुष अधिकारी आणि डॉक्टरांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आपल्याला अनेक वेळा त्रास झाल्याचेही तिने या पत्रात नमूद केले आहे.
पीडितेने पत्रात म्हटले आहे की, आरोपीने तीसऱ्यांदा अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र मी तीव्र विरोध केल्याने त्याला ते शक्य झाले नाही. माझा आवाज खोल गेल्याने आवाज निघतच नव्हता. शिवाय त्यावेळी माझ्या मनात बलात्कारच्या विविध घटनांत झालेल्या हत्यांच्या गोष्टी असल्याने मी जीव वाचवणे योग्य समजले.
तसेच नियुक्त केलेल्या सरकारी वकिलांबद्दल आत्ताच आपल्याला काही आक्षेप घ्यायचा नाही. त्यांच्यावर आक्षेप घेता येईल अशी माहिती असल्याचा दावा तीने पत्रात केला आहे. तर आपण विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती, मात्र पोलिसांनी तुला यायला एक दिवस उशीर झाला असे सांगितले. याचा अर्थ अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही का? असा सवालही तीने पत्रात केला आहे.



