Swargate Case : आरोपी दत्तात्रय गाडेने लॉक केलेल्या शिवशाही बसचा दरवाजा कसा उघडला? धक्कादायक माहिती आली समोर

पुणे : दिवस-रात्र प्रवाशांची वर्दळ असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर एका 26 वर्षीय तरुणीवर दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला. या घटनेचे पडसाद पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उमटल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. दत्ता गाडे हा राजकीय नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही तो प्रचारात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी पीडित तरुणी ही पुण्याहून फलटणला जात होती. फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत होती. त्याच वेळी आरोपी दत्तात्रय गाडे याने तिचा गैरफायदा घेतला.
आरोपीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला. बस बंद असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि घटना स्थळावरून फरार झाला.
बंद असलेली शिवशाही बस कशी उघडली?
या घटनेनंतर बंद असलेली शिवशाही बस आरोपीने कशी उघडली? हा प्रश्न समोर येताना दिसत आहे. ही घटना समोर आल्यानंतर एसटी महामंडळाने तातडीने अत्याचार झालेल्या बसची जबाबदारी असलेल्या बस चालकाला बोलावणं धाडलं आणि खात्याअंतर्गत चौकशी केली. यावर चालकाने महत्त्वाची माहिती दिली. चालकाने बस उभी केल्यानंतर सगळे दरवाजे लॉक केले होते. मात्र, बसच्या तांत्रिक रचनेनुसार एअर प्रेशर उघडल्याने दरवाजा ऑटोमॅटिक अनलॉक होतो. या प्रकरणातही गाडीतले एअर प्रेशर उघडल्याने या बसचे दरवाजे उघडले.




