Pune : निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले पुणे विमानतळावर दाखल; गंभीर आरोप करत म्हणाले…

Ranjit Kasale | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी समोर आली. राज्यभरात या हत्या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. या प्रकरणात दररोज नवे ट्वीस्ट आणि माहिती समोर येत आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटविर्तीय वाल्मिक कराड यांना देखील पोलिसांनी अटक केली. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.
निलंबित पोलीस अधिकार रणजीत कासले यांनी वाल्मिक कराडाचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनजंय मुंडे यांनी केल्याचा खळबळजनक दावा केला. यानंतर ते गायब झाले होते. त्यांंच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होताच ते पुण्यात दाखल झाले होते. पुणे विमानतळावर दाखल होताच कासले यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीत गप्प राहण्यासाठी १० लाख रुपये दिल्याचा गंभीर आरोप कासले यांनी केला आहे.
रणजीत कासले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी अॅाफर देण्यात आली होती, असा दावा या व्हिडिओत त्यांनी केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर कासले गायब झाले होते. यानंतर कासले पुणे पोलिसांना शरण जाणार असल्याचे सांगितले होते. ते पुणे विमानतळावर दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलाताना गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
काय म्हणाले कासले ?
पुणे पोलिसांना शरण जाण्यासाठी मी आलो आहे. १५ दिवस तरी मला कोणी पकडले नसते. पण माझ्या मित्रांशी बोलून मी निर्णय घेतला. बीडला जाऊन मी शरण जाणार आहे. पुणे पोलिसांना तशी मी विनंती केली आहे की मला संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या स्वाधीन करावे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यावर १० लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्यातील साडेसात लाख रुपये मी परत केले आहेत. मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी दिले होते, असा दावा कासले यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
मुंडेवर गंभीर आरोप
संत बाळूमामा कंस्ट्रक्शन कंपनी ही वाल्मिक कराडच्या मालकीची आहे. या कंपनीत महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीतून माझ्या बँक खात्यावर दहा लाख रुपये आले होते. यातले साडे सात लाख रुपये मी परत केले आहेत. उर्वरित पैशातून माझा खर्च चालू आहे. ईव्हीएम मशीनपासून दूर जाण्यासाठी तसेच मी गप्प बसावे म्हणून मला हे दहा लाख रुपये देण्यात आले होते, असा दावा कासले यांनी केला आहे. परळीला माझी ड्यूटी होती. धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले आहेत, असे देखील कासले यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले.





