Pune : पोर्शे प्रकरणात पुरवणी दोषारोपपत्र दाखल

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोर्शे कारच्या मागील सीटवर बसलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने ससूनमध्ये बदलल्याप्रकरणी आरोपी अरुणकुमार सिंग याच्याविरोधात ४७७ पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याच प्रकरणात ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे याच्या विरोधातील पुरावे, आरोपींचे जबाब आणि सीडीआर पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे.
कल्याणीनगर येथे १८ मे २०२४ च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने पोर्शे कार भरधाव चालवून धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण- तरुणीचा मृत्यू झाला होता. कारचालक मुलगा व पाठीमागील आसनावर बसलेल्या दोन मित्रांनी अपघातापूर्वी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपान केले होते. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी सर्वांना ससून रुग्णालयात नेण्यात आले.
तिथे या मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल व शिवानी अग्रवाल, अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून शिपाई अतुल घटकांबळेमार्फत ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिली होती.
त्या वेळी अरुणकुमारच्या सांगण्यावरून त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने आशिष मित्तल याला एका मुलाच्या जागी स्वतःच्या रक्ताचे नमुने देण्यासाठी पैसे दिले होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे. आता एकूण दहा आरोपींविरोधातही दोषारोपपत्र दाखल झाले असून, त्यांच्या विरोधात एकत्रित खटला चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




