Pune : उपनगरे ठरतील गेमचेंजर; मध्यवस्तीच्या तुलनेत दुप्पट लोकसंख्या

पुणे – महापालिकेच्या आगामी प्रभाग रचनेत उपनगरांतील लोकसंख्या आणि प्रत्यक्ष मतदारसंख्येतील वाढीचा विचार केल्यास, या भागांना जास्तीत जास्त नगरसेवक मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रभाग रचना झाल्यास उपनगरांमध्येच जवळपास १०० ते १०५ नगरसेवक असतील असे प्राथमिक चित्र आहे.
परिणामी, शहराच्या मध्यवस्ती आणि उपनगरांतील विकासातील असमतोल दूर करण्यासाठीही ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमुळे ही प्रभाग रचनेची समिकरणे बदलली आहेत.
प्रशासनाकडील माहितीनुसार, हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि कोथरूड या चार विधानसभा मतदारसंघांसह समाविष्ट ३२ गावांची एकत्रित लोकसंख्या २२ लाख ६४ हजार ९६६ इतकी आहे. तर, मध्यवस्तीत मोडणाऱ्या कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती आणि शिवाजीनगर या मतदारसंघांची लोकसंख्या केवळ १२ लाख १६ हजार इतकी आहे.
महापालिका प्रशासनाकडून सद्यस्थितीत प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू असून, येत्या महिनाअखेरपर्यंत ती अंतिम करण्यात येणार आहे. ही रचना २०११ च्या जनगणनेनुसार केली जाणार आहे. त्यानुसार, महापालिकेची एकूण लोकसंख्या ३४ लाख ८१ हजार इतकी असून, नगरसेवकांची संख्या १६५ होणार आहे. एकूण ४२ प्रभाग असणार असून, त्यामध्ये ३९ प्रभाग चार सदस्यीय तर ३ प्रभाग तीन सदस्यीय असतील.
प्रभाग रचनेचे संभाव्य गणित…
निवडणूक विभागाच्या माहितीनुसार हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि कोथरूड या चार विधानसभा मतदारसंघांसह समाविष्ट ३२ गावांची एकत्रित लोकसंख्या २२ लाख ६४ हजार ९६६ इतकी आहे. तर, मध्यवस्तीत मोडणाऱ्या कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती आणि शिवाजीनगर या मतदारसंघांची लोकसंख्या केवळ १२ लाख १६ हजार इतकी आहे.
शासनाच्या सूचनेनुसार प्रभागांची रचना लोकसंख्येच्या सरासरीनुसार (७५ ते ८० हजार) उपनगरांत केली गेल्यास, त्या भागात सुमारे २८ ते ३० प्रभाग तयार होऊ शकतात. त्यामध्ये २५ ते २६ चार सदस्यीय आणि २ ते ३ तीन सदस्यीय प्रभागांचा समावेश होईल. त्यामुळे उपनगरांत १०५ ते ११० नगरसेवकांची निवड होऊ शकते. तर, मध्यवस्तीत ९० हजार लोकसंख्येच्या सरासरीनुसार प्रभाग रचना केल्यास, १२ ते १४ प्रभागांमधून ५० ते ५४ नगरसेवक निवडून येतील असे चित्र आहे.-
मतदारसंख्याही अधिक…
महापालिकेची प्रभाग रचना २०११च्या लोकसंख्येवर होणार असली तरी, प्रत्यक्षात मतदारांची संख्या विधानसभा निवडणुकांची आकडेवारी पाहता ३८ लाखांच्या आसपास आहे. गेल्या काही वर्षांत शहराच्या उपनगरांमध्ये आणि प्रामुख्याने नव्याने समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून मतदारांची संख्या वाढली आहे. परिणामी, महापालिकेच्या सत्ता समिकरणात जुनी २३ गावे आणि नव्याने समाविष्ट ३२ गावांमधील मतदारांचा कौल महत्वाचा ठरणार आहे.





