पुणे – बालभारतीकडून चालू शैक्षणिक वर्षात सर्व विषयांसाठी स्वतंत्र पुस्तके छापण्यात आली. मात्र, शाळांनी दिलेल्या यादीत इंटिग्रेटेडच्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला. इंटिग्रेटेडची बाजारात पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी, पालकांचा गोंधळ उडाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार राज्यातील राज्य मंडळाच्या बोर्डाच्या शाळा येत्या १६ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे बाजारात शालेय साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी, पालक यांची गर्दी होत आहे. आप्पा बळवंत चौकात इयत्ता पहिली पासून बारावीपर्यंतची पुस्तके घेण्यासाठी दुकानासमोर रांगा लागत असल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे. शालेय साहित्याच्या किंमतीत वाढही झालेली आहे. शाळांकडून विद्यार्थ्यांना बाजारातून कोणती पुस्तके आणावीत, याची यादीच देण्यात आली आहे. त्यातही काही शाळांनी मागील वर्षापूर्वीची यादी जशीच्या तशी पालकांना दिली. त्यात इंटिग्रेटेड पुस्तकांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक पालक इंटिग्रेटेड पुस्तकासाठी दुकानदारांकडे आग्रह धरू लागले आहेत. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून वह्यांची कोरी पाने वगळण्यात आली. एकत्रित अर्थात इंटिग्रेटेड पद्धतीने छापली जाणारी पुस्तके बंद करून स्वतंत्र विषयासाठी वेगवेगळी पुस्तके छापण्यात आली आहेत. बालभारतीकडे मागील वर्षाचा पुस्तकांचा साठा उपलब्ध होता. यावर्षी सुद्धा नव्याने छापण्यात आलेल्या पुस्तकांचा साठा सुद्धा बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात आला. बालभारतीने पुस्तक छपाई संदर्भात पूर्वीच सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले होती. काही पालकांना याबाबत कल्पना नव्हती. या पालकांनी शाळेने दिलेल्या यादीनुसारच पुस्तके द्यावेत, असा आग्रह पुस्तक विक्रेत्यांकडे धरत असल्याने गोंधळ उडत असल्याचे आढळून येत आहे. प्रत्येक विषयासाठीचे स्वतंत्र पुस्तकेच विकत घ्यावे लागणार मागील वर्षातील शिल्लक असलेली इंटिग्रेटेड पुस्तके आणि यंदा छापलेली सर्व विषयांसाठीची स्वतंत्र पुस्तके अशी दोन्ही प्रकारची पुस्तके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होती. परंतु इंटिग्रेटेड पुस्तकांचा साठा लवकर संपल्यामुळे पालकांचा गोंधळ उडाला. काही पालक पुस्तक खरेदी न करताच घरी परतत आहेत. पुस्तक विक्रेत्यांनी समजून सांगितल्यानंतरही अनेक पालक शाळेने दिलेल्या यादीनुसारच आम्हाला पुस्तके हवीत, असा हट्ट धरत आहेत. बालभारतीने यंदा इंटिग्रेटेड पुस्तकांची छपाई केली नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसाठी प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तकेच विकत घ्यावी लागणार आहेत.