Pune : वसतिगृह हलविल्याने विद्यार्थी आक्रमक

पुणे – येरवड्यातील बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहाचे विश्रांतवाडीला स्थलांतर करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे संतप्त झालेले विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या निर्णयाविरोधात विद्यार्थी शनिवारपासून उपोषणाला बसले आहेत.
येरवड्यातील मुलांच्या वसतिगृहच्या जागी मुलींचे वसतिगृह उभारण्याचा समाज कल्याण विभागाचा विचार आहे. मात्र, स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान होईल, असे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वसतिगृह प्रशासन, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या बुधवारी (२५ जून) झालेल्या बैठकीत मुलांचे वसतिगृह हालवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर रविवारपर्यंत वसतिगृह खाली करून विश्रांतवाडीतील इमारतीत जाण्याचा आदेश दिला गेला.
विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता अल्पावधीत तडकाफडकी स्थलांतर केल्याने विद्यार्थी संतापले. निर्णयाला विरोध करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार विश्रांतवाडीतील संकुलात अभ्यासासाठी लागणाऱ्या सुविधांचा अभाव आहे, संकुलात अभ्यासिका, ग्रंथालय, व्यायामशाळा किंवा बाग अशी कोणतीही सोय नाही.
विद्यार्थी वसतिगृह निवडताना शैक्षणिक संस्थांपासून असलेल्या अंतराचा विचार करतात. नव्या ठिकाणी गेल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवास खर्चात वाढ होईल, वेळेचे गणित बिघडेल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याशिवायही विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विश्रांतवाडीतील वसतिगृह मुले आणि मुली अशा दोघांसाठी तयार केले होते. मात्र मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीत मुलांना पाठवून येरवड्यात मुलींचे स्वतंत्र वसतिगृह तयार करण्याचा समाजकल्याण विभागाचा विचार आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात मुला आणि मुलींचे वसतिगृह एकाच ठिकाणी असू शकत नाही का, अशी विचारणा विद्यार्थी करत आहेत. या आंदोलनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि इतर विद्यार्थी संघटनांनी पाठींबा जाहीर केला आहे.





