Pune District: जलस्त्रोतांचे बळकटीकरण करा

मंचर : जल स्त्रोतांचे बळकटीकरण व मजबुतीकरण करून पाणी देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला शुक्रवार, दि. २५ रोजी केली.
आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील वेळ, घोड व भीमा खोऱ्याचा भूशास्त्रीय अभ्यास करून जुन्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण व नवीन जलस्त्रोतांचे मजबुतीकरण करून लोकांना पाणी देण्याचे नियोजन सुरू असून याबाबतचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या उपस्थितीत पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी डॉ.सुमन पांडे, डॉ. संजय पाटील, डॉ. पडघमकर यांनी या भागाचा अभ्यास करून सद्यस्थिती व सुचवलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात केले.
यावेळी कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता सुजाता हांडे, गौरव बोरकर नाम व पाणी फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते. वरील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासावरून त्यांनी आदिवासी भाग, मधला भाग, पूर्व भाग व पाबळ परिसरातील भाग असे चार वेगवेगळे भाग करून त्याचा सविस्तर आढावा यावेळी मांडला. विहिरी, विंधन विहिरी, तळी, नाले, ओढे यांचा देखील त्यांनी यामध्ये अभ्यास केला व पानलोट नकाशा तयार करून त्यावर उपाययोजना सुचवल्या. यामध्ये जुन्या तलावांची दुरुस्ती शास्त्रीय पद्धतीने करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
आराखडा पुढील पाच वर्षाचा केला जावा, ज्या ठिकाणी धरण, नदी तलावांचे ,पाणी मिळत नाही त्या भागाला पाणी देण्याचे काम यातून करता आले पाहिजे. यासाठी शासनाचा जलसंधारण विभाग त्याचबरोबर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना देखील मदत करेल.
– दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री आणि आमदार.
प्रत्येक गावात पूर्वीपासूनची पाण्याची ठिकाणे आहेत, याचे बळकटीकरण केल्यास प्रत्येक गावाला पाणी मिळेल. यासाठी प्रत्येक गावाची गाव निहाय माहिती संकलित करा व नोंदी घ्या. या कामांसाठी अटल भूजल, कृषी विभाग, नरेगा व जिल्हा नियोजन समिती यामधून निधी दिला जाईल. मे महिन्यात ही कामे सुरू झाली पाहिजेत, असे नियोजन करा. असा आराखडा पूर्ण पुणे जिल्ह्याचा करा.
-जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी, पुणे.





