Pune : आपत्कालिन स्थिती पुन्हा होणार नाही; शहर पाण्यात गेल्यानंतर महापालिका प्रशासनाचा दावा

पुणे -शहर- उपनगरांत शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे आपत्कालिन स्थिती निर्माण झाली होती. त्यावर मनपा प्रशासनावर चारही बाजूंनी टीकेचा भडिमार झाला. त्यावर शनिवारसारखी स्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी ढगफुटीसदृश स्थिती संपूर्ण शहरात निर्माण झाली होती. ठिकठिकाणी वाड्यावस्त्यांमध्ये पाणी शिरले होतेच, शिवाय रस्त्यांवरही गुडघाभर पाणी साचले होते. पावसाळी जाळ्यांमध्ये कचरा साचल्याने रस्त्यावर साठलेल्या पाण्याचा निचरा झाला नाही, त्यामुळेपाणी रस्त्यांवर साठून राहिले. तसेच बैठ्या घरांमध्ये पाणी शिरले आणि सोसायट्यांचे पार्किंग पाण्याखाली गेले.
पावसाळा सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी जोरदार पाऊस आल्याने महापालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थेचा बोजवारा उडाला. पावसाळी कामे केल्याचा दावाही त्या पाण्याबरोबर वाहून गेला. अनेक ठिकाणी झाडे पडली, झाडांच्या फांद्याही पडल्या.
अप्पर इंदिरा नगर भागात वीस वर्षीय तरुणाचा अंगावर झाड पडून मृत्यू झाला.
नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी झाडांची छाटनी न केल्याने ही घटना घडली आहे. त्यामुळे संबंधितक जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
“शनिवारच्या परिस्थितीनंतर रविवारी दिवसभरात पडलेल्या फांद्या, झाडे काढून टाकले आहे. याशिवाय पावसाळी जाळ्या साफ केल्या आहेत. त्यामुळे पाणी साठण्याचा प्रकार होणार नाही अशी अपेक्षा आहे.” – महेश पाटील, उपायुक्त, पुणे महापालिका
अधिकारी आऊट अॉफ कव्हरेज एरिया
महापालिकेतील आपत्कालिन नियंत्रण विभागाचे अधिकारी गणेश सोनुने यांना संपर्क केला असता, नेहमीप्रमाणे त्यांचा मोबाइल आऊट अॉफि कव्हरेज एरिया होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.





