पुणे : एसटी सेवा हळूहळू मार्गावर; कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ

पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्य शासनात विलीनीकरण होण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले होते. मात्र आता कोर्टाचा निकाल आणि कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी मार्गावर धावणाऱ्या बसेस आणि प्रवासी संख्या वाढ झाली आहे. सध्या पुणे विभागातून 430 बसेस धावत असून, प्रवासी संख्या 70 हजारांवर पोहोचली आहे. प्रशासनाने लांब पल्ल्याचे मार्ग सुरू केले असले तरी, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही मार्गाची सेवा अद्यापही स्थगित आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी 8 नोव्हेंबरपासून एसटीचे कर्मचारी संपावर गेले होते. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे तुर्तास विलीनीकरणाचा मुद्दा स्थगित झाला आहे. त्यापाठोपाठच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. तर कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोपदेखील त्यांच्यावर करण्यात येत आहे. या घडामोडींचा संपावर परिणाम झाला असून, पुन्हा कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशनसह पिंपरी-चिंचवड या प्रमुख स्थानकांवर मागील काही दिवसांपासून प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रामुख्याने नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, महाबळेश्वर, ठाणे, दादर, मुंबई, कल्याण आदी मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी बसेसची वारंवारिता वाढवण्यात येत आहे. तर पुणे विभागातील भोर, नारायणगाव, राजगुरुनगर, तळेगाव, शिरुर, बारामती, सासवड, इंदापूर, दौंड, एमआयडीसी आगार या आगारांतून धावणाऱ्या बसफेऱ्या वाढल्या आहेत. दरम्यान, या आगारांतून जिल्ह्यातीलअंतर्गत ग्रामीण भागामध्ये धावणाऱ्या बसेसचे प्रमाण मात्र तुरळक असल्याचे चित्र आहे.
उत्पन्न 87 लाखांवर…
पुणे विभागात एकूण 4,192 कर्मचारी असून सध्या 2 हजार 959 जण रुजू झाले आहेत. कामावर रुजू झालेल्यांमध्ये 948 चालक, 899 वाहक, 635 यांत्रिक विभागातील आणि 477 प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संपापूर्वी 950 बसेसद्वारे 2 हजार 624 फेऱ्या होत होत्या. तर सध्या 430 बसेसच्या 1 हजार 330 फेऱ्या दररोज होत असून, उत्पन्नदेखील 87 लाखांवर पोहोचले आहे. 22 एप्रिलपर्यंत ग्रामीण भागातील फेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.





