पुणे: विमानप्रवाशांची गैरसोय टळणार; लवकरच मेट्रो स्टेशन ते विमानतळ विशेष बससेवा

पुणेः शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पीएमपीएमएल या प्रवासी वाहतूकीला पर्याय म्हणून महामेट्रोची सुविधा देण्यात आली. मात्र, महामेट्रोचे जाळे संपूर्ण पुणे शहरात पसरलेली नाही. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरपर्यंत मेट्रोची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे महामेट्रोच्या नजीकच्या स्थानकावरून विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी मेट्रो मार्गिका नाही, त्या परिसरापर्यंत मेट्रो स्थानक ते घर परिसर अशी सुविधा सुरू करण्याचा मानस आहे.
त्यासाठी महामेट्रोला एक हजार बसची आवश्यकता आहे. तसेच ही सेवा अल्पदरात द्यायची असल्याने याबाबतचे नियोजन महामेट्रो आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू आहे. लवकरच ही सेवा उपलब्ध करून देणअयात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकात पाटील म्हणाले, वनाज ते रामवाडी ही मेट्रो विमानतळापर्यंत जात नाही, नवीन मार्गिका प्रस्तावित असल्या तरी त्या ठिकाणापर्यंत मेट्रो जाणे अशक्य आहे. यामुळे ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणाहून बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही बससेवा अल्पदरात असेल, तसेच महामेट्रोच्या स्टेशनवरून घराच्या परिसरापर्यंत विशेष बससेवा देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास करताना एकसूत्रीपणा येणार आहे.
२०३० पर्यंत संपूर्ण शहरात मेट्रो –
पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मेट्रोकडे सक्षम पर्याय म्हणून पाहिले जाते. शहरात प्रत्येक ठिकाणी मेट्रो मार्गिकांच्या विस्तारासाठी काम सुरू आहे. २०३० पर्यंत पुणे शहरात सर्वच ठिकाणी मेट्रोचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्थलांतर करण्याचा विचार सुरू होता. त्यामुळे मेट्रो मार्गिकेच्या मूळ आराखड्यात आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला नाही, असेही त्यांनी सांगितले.





