Pune: परीक्षा रद्दची नामुष्की, आता फेरपरीक्षा

पुणे – जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील 670 पदांसाठीच्या फेरपरीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार आहे. ही परीक्षा अधिक पारदर्शक, कोणत्याही तांत्रिक त्रुटींशिवाय पार पडावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. दरम्यान, नियोजित वेळापत्रकानुसार फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या परीक्षेत गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास येताच ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली होती.
मंत्रालयामध्ये सदर फेरपरीक्षा आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी राठोड बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, टी.सी.एस. कंपनीचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या पदासाठी दि.19 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा शासनमान्य टी. सी.एस. या कंपनीमार्फत राज्यातील 28 जिल्ह्यांतील निश्चित केलेल्या एकूण 66 केंद्रांवर दि.20 व दि.21 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या परीक्षेदरम्यान नांदगाव पेठ, अमरावती शहर येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आता, या पदासाठी फेरपरीक्षा दि.14, 15 व 16 जुलै 2024 या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अनुचित प्रकार घडल्यास फौजदारी गुन्हा
राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या सात शहरांतील अधिकृत केंद्रावरच ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षार्थी यांनी वेळोवळी याच अधिकृत केंद्रावर परीक्षा घेण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र इ. बाबत सर्व उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ही परीक्षा होणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास संबंधितास जबाबदार ठरवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.





