Pune : अकरावीच्या काही तुकड्या बंद पडणार

पुणे – अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीनंतर राज्यात ६ लाख ७५ हजार ५३६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्याप तब्बल १४ लाख ६२ हजार १७ जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाहीत, तर अकरावीच्या काही तुकड्याच बंद पडण्याच्या धोका असून, शिक्षकांच्या नोकऱ्याही अडचणीत येणार आहेत.
अकरावीसाठी ९ हजार ४९१ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, यात २१ लाख ३७ हजार ५५० जागा आहेत. यात कॅपअंतर्गतच्या १७ लाख ६२ हजार ७९६, तर विविध कोट्याअंतर्गतच्या ३ लाख ७४ हजार ७५४ जागांचा समावेश आहे. प्रवेशासाठी १४ लाख १२ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.
कॅपअंतर्गत ५ लाख ८ हजार ५३, तर कोट्याअंतर्गत १ लाख ७ हजार ४८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. अजूनही कॅपअंतर्गतच्या ११ लाख ९४ हजार ७४३, तर कोट्याअंतर्गत २ लाख ६७ हजार २७१ जागा रिकाम्या आहेत. आता तिसरी प्रवेश फेरी सुरू झाली आहे.
बहुसंख्य विद्यार्थी अनुदानित कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. सध्या अनुदानित तुकड्यांतील प्रवेशही पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुरेशा संख्येअभावी अनुदानित बरोबरच विनाअनुदानित तुकड्याही बंद पडणार आहेत. विद्यार्थी नसल्यास विनाअनुदानित महाविद्यालये चालविणे संस्थाचालकांना कठीण बनणार आहे. विद्यार्थ्यांचा विज्ञान, वाणिज्य शाखेकडे प्रवेशाचा कल असला, तरी कला शाखेकडे पाठच फिरवली आहे. त्यामुळे कला शाखांच्या तुकड्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे.
तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक
२२ ते २३ जुलै – नवीन विद्याथी नोंदणी व अर्जाच्या भाग-१ मध्ये दुरुस्ती, अर्जाचा भाग-२ भरणे, २६ ते २८ जुलै – पोर्टलवर प्रवेश जाहीर करणे, विद्यार्थी व महाविद्यालय लॉगीनमध्ये तपशील दर्शविणे, कट ऑफ जाहीर करणे, विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे, ३० जुलै – रिक्त जागा दर्शविणे.





