Pune : विमानाच्या कॉकपिटमधून धूर… अन् कळले हे तर मॉकड्रिल

पुणे – लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाच्या कॉकपिटमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले आणि सर्व यंत्रणांना अलर्ट देण्यात आला. क्षणात उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सर्व यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि परिस्थिती आटोक्यात आणली. या वेळी हे माॅकड्रील असल्याचे समजल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
विमानतळावर प्रवाशांची सुरक्षा आणि आत्पकालीन परिस्थितीत उद्भवणाऱ्या अडचणीला कशा प्रकारे हाताळावे, यासाठी हे मॉकड्रिल घेण्यात आले. त्यामध्ये विविध विभागांतील ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. विमानाच्या कॉकपिटमध्ये धूर निदर्शनास आल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ एअरपोर्ट इमर्जन्सी प्लॅन सक्रिय केला.
सर्व यंत्रणांना सतर्क करून तत्काळ विविध आपत्कालीन केंद्रे उभारण्यात आली. त्यामध्ये इमर्जन्सी कंट्रोल सेंटर (ECC), इमर्जन्सी ऑपरेशन्स सेंटर (EOC), इमर्जन्सी कंट्रोल रूम (ECR), मीडिया सेंटर आदी विभागांचा समावेश होता. या घटनेला भारतीय वायुसेनेच्या एअरक्राफ्ट रेस्क्यू ॲण्ड फायर फायटिंग युनिटसह पुणे महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलांनी त्वरित प्रतिसाद दिला.





