पुणे – शहरांत वाढणाऱ्या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहनांना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक वाहनचालकांचे याकडे दुर्लक्ष असते. परिणामी, प्रदूषणास कारणीभूत ठरणारी वाहन रस्त्यावर धावत असतात. वाहतूक पाेलिसांकडूनही अशा वाहनांवर कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने धूर फेकणारी अनेक वाहने रस्त्यावर बिनदिक्कत धावत असतात. परंतु, आता पीयूसी तपासली जाणार असून पोलिसांकडूनही कारवाई करण्यात येत आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाई करीत सुमारे १३ हजार वाहनांची तपासणी केली आहे. तर, ४ हजार वाहनांवर प्रत्यक्षात कारवाई केली आहे. यातून सुमारे ६४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान करण्यात आली. सध्या, थंडीचा महिना सुरू आहे. धुक्याचे प्रमाणदेखील अधिक आहे. धुक्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होते. परिणामी, हवेच्या प्रदूषणाचा स्तर वाढत जातो. येणाऱ्या काळात पुण्यात हवेचे प्रदूषण वाढू शकते. त्यामुळे पुणे आरटीओदेखील पीयूसी नसलेल्या वाहनांवर कारवाईचे प्रमाण वाढविणार आहे. गेल्या महिन्यांत आरटीओच्या वायुवेग पथकाने ५ हजार ३२३ वाहनांची तपासणी केली. यामध्ये १४६५ वाहनचालकांकडे पीयूसी प्रमाणपत्र नव्हते, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून १९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असा आहे दंड… – वाहनाच्या प्रकारानुसार पीयूसीचे दर आकारले जातात – पीयूसी नसेल तर दुचाकीसाठी दोन हजार दंड – चारचाकीसाठी चार हजार रुपयांचा दंड “वाहनांना पीयूसी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांची पीयूसी चाचणी केली जाते. येत्या काळात प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाईल.” – अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.