Pune : सीईटी सेलचा संथगती कारभार

पुणे – शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल लागून दोन महिने झाले, तरी राज्य सीईटी सेलची प्रवेश प्रक्रिया अजूनही संथपणेच सुरू असल्याचे दिसते. बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांची केवळ अर्जासाठी नोंदणीच सुरू आहे. याउलट खासगी, अभिमत विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रियेचे अंतिम टप्पे पूर्ण करून वर्ग सुरू करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे.
या विलंबामुळे शासकीय, अनुदानित कॉलेजमधील जागा रिकाम्या राहण्याची चिन्हे आहेत. यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याच्या भीतीने पालक, विद्यार्थी चिंतेत आहेत.
बारावीचा निकाल लवकर लागल्याने प्रवेश प्रक्रिया वेळेत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सीईटी सेलने ह्या अपेक्षांवर पाणी फिरवले आहे. निकाल लागून दोन महिने झाले, तरी अद्याप केवळ नावनोंदणीच सुरू आहे. एकाही अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश फेरी जाहीर झालेली नाही. याउलट खासगी विद्यापीठे प्रवेशप्रक्रियेत आघाडीवर असल्याची स्थिती आहे.
खासगी पुढे, सरकारी मागे
खासगी, अभिमत विद्यापीठांनी आपली प्रवेश प्रक्रिया वेळेत राबवून आता अंतिम टप्प्यात आणल्या आहेत. काही ठिकाणी निवड यादीही जाहीर झाली असून, वर्ग लवकरच सुरू होतील. सीईटीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रवेशांमध्ये अशी गती कुठेही दिसत नाही. त्यामुळे सरकारी, खासगी यंत्रणेच्या कार्यक्षमतेतील तफावत स्पष्टपणे दिसत आहे. या संथगती कारभारमुळे शासकीय व अनुदानित महाविद्यालयांत जागा रिकाम्याच राहण्याची शक्यता आहे.
अजूनही प्रवेश फेरी नाही
निकालास ६० दिवसांहून अधिक काळ लोटूनही सीईटी सेलने एकही प्रवेशाची पहिली फेरी राबविलेली नाही. प्रत्यक्ष प्रवेश आणि नियमित प्रवेश फेरीचेही वेळापत्रक जाहीर झालेले नाहीत. परिणामी, जुलैच्या अखेरीस अथवा ऑगस्ट महिन्यात पहिली फेरी होण्याची शक्यता असून, संपूर्ण प्रक्रिया सप्टेंबरअखेरपर्यंत लांबणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होण्याची चिन्हे आहेत.
विद्यार्थ्यांत संभ्रम, प्रशासन गप्प
विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकजण खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याच्या विचारात आहेत. मात्र, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. शासकीय व अनुदानित अभ्यासक्रमांचे प्रवेश लांबल्याने गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात राज्य सीईटी सेलच्या प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सीईटी सेल म्हणजे काय?
राज्य सीईटी सेल ही एक यंत्रणा आहे. ती राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी कार्यरत आहे. सीईटी परीक्षा घेऊन संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले जाते. विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया, कागदपत्रांची पडताळणी आणि गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. सीईटीद्वारेच विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे अनिवार्य आहे.





