पुणे : लग्नाच्या पैशावरून बहिणीचा खून; मानलेल्या भावाला जन्मठेप आणि १० लाखांचा दंड

पुणे – मुलीच्या लग्नासाठी म्हणून १० ते १२ वर्षात थोडे थोडे करून दिलेले पैसे परत मागितल्याने बहिणीचा गळा आवळून खून करणाऱ्या मानलेल्या भावाला जन्मठेप आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. फिर्यादीनुसार १४ ते १५ लाख रुपयांची रक्कम आहे. दंडाच्या रक्कमेपैकी ९ लाख रुपये मयत महिलेच्या फिर्यादी मुलगा आणि मुलीला देण्यात यावेत. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
रविंद्र श्रीनिवास जालगी (वय ४८, रा. कर्वेनगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. कस्तुरी शेखर माने (वय ४५) यांच्या खून प्रकरणी मुलगा प्रज्वल (वय १९. रा. हिंगणे, मूळ – कर्नाटक) याने सिंहगड रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना १३ एप्रिल २०१९ रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. सिंहगड रोडचे तत्कालीन अधिकारी सतिश उमरे यांनी तपास केला. सहायक पोलीस फौजदार एस.पी. पुणे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम केले.
मयत कस्तुरी यांचा आरोपी रविंद्र हा मानलेला भाऊ होता. मुलीच्या लग्नासाठी म्हणून थोडे थोडे पैसे त्यांनी त्याच्याकडे ठेवायला दिले होते. मुलीचे लग्न असल्यामुळे त्या पैसे परत मागत होत्या. त्यावेळी तो भांडण काढत होता. फिनेल पिण्याचे नाटक करून मयत व मुलांना घाबरवत असे. घटनेच्या दिवशी मयत आणि तो दोघेच घरात होते. त्यावेळी त्याने तिचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.





