पुणे सिंहगड रस्ता ते कर्वेनगर आता अवघ्या दोन मिनिटांत

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगर परिसरात जाण्यासाठी महापालिकेकडून सनसिटी ते कर्वेनगर असा नवीन उड्डाणपूल मुठा नदीवर उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या कामासाठी 45 कोटींच्या अंदाजित खर्चास महापालिकेच्या सोमवारी झालेल्या एस्टीमेट कमिटीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सनसिटीकडून सिंहगड रस्त्यावर येऊन पुढे कर्वेनगरमध्ये जाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर जावे लागत होते. मात्र, हे अंतर आता अवघ्या 500 मीटरच्या आत येणार असून, अवघ्या दोन मिनिटांत या भागात जाता येणार आहे.
कोथरूड, कर्वेनगर आणि नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) दरम्यानच्या राजाराम पुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे विकास आराखड्यात हा पूल प्रस्तावित केला होता. मात्र पूल उतरण्याच्या ठिकाणच्या जागा खासगी मालकीच्या असल्याने भूसंपादनाअभावी पुलाचे काम सुरू होऊ शकले नव्हते. सध्या सुमारे 95 टक्के जागा पालिकेच्या ताब्यात आल्या असून, एकूण सुमारे साडेसात कोटी रुपये मोबदला दिला जाणार आहे.
याशिवाय याच रस्त्याला सनसिटी रस्त्यावरून मुख्य सिंहगड रस्त्यावरील इंडियन ह्युम पाईपमधून एक रस्ता प्रस्तावित असून, त्याचे भूसंपादन मार्गी लागल्यास गोयल गंगा चौकातून वाहनांना थेट कर्वेनगर आणि पुढे कोथरूडकडे जाण्यासाठी सर्वांत जवळचा रस्ता उपलब्ध होणार आहे.





