Pune: सिद्धार्थ शिरोळे यांचा एकतर्फी विजय; निवडणूक अटीतटीची होण्याचा अंदाज ठरला फोल

पुणे : अटीतटीची होईल, अशी वाटणारी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी झाली आहे. कॉंगेसचा बंडखोर उमेदवार भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांचा विजयाला हातभार लावेल, असे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात कॉंग्रेस अधिकृत आणि अपक्ष उमेदवार दोघांच्या मतांपेक्षा भाजपच्या शिरोळे यांना अधिक मते मिळाली आहेत.
मागील वेळी (२०१९) शिरोळे यांनी ५ हजार १२४ मतांनी विजय मिळविला होता. त्या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला १९ हजार ४५४ मते मिळाली होती. त्यामुळे यंदा शिरोळेंची जागा अडचणीत असल्याचे बोलले जात होते. मात्र, कॉंग्रेसच्या बंडखोर उमेदवाराचा फायदा होईल, अशीही एक चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. त्या वेळी चित्र वेगळेच होते. पहिल्या फेरीपासूनच भाजपच्या शिरोळे यांनी आघाडी घेतली.
पहिल्या फेरीत ४ हजार १३४, तर बहिरट यांना २ हजार ५८६ मते मिळाली होती. पहिल्याच फेरीत औंध- बोपोडी या परिसरातील मतपेट्या मोजणीसाठी आल्या होत्या. या भागात प्राबल्य असलेले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनीष आनंद यांना १ हजार ३२३ मते मिळाली. पाचव्या फेरीअखेर शिरोळेंना ११ हजार ३३४ मतांचे मताधिक्य होते. पाचव्या फेरीनंतर शिरोळे यांना एकूण २० हजार १८२ मते होती, तर बहिरट यांना ११ हजार १६८ मते होती.
तिसऱ्या क्रमांकावर असलेले आनंद ६ हजार ४३ मते पडली होती. दहाव्या फेरीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट झाले. शिरोळे यांनी १७ हजार ४२७ मताधिक्य मिळविले. त्यानंतर झालेल्या फेऱ्यांमध्ये शिरोळे यांचे मताधिक्य वाढतच गेले. १५ व्या फेरीमध्ये मात्र बहिरट यांना ५६० मतांची आघाडी मिळाली. केवळ या एका फेरीतच त्यांना आघाडी मिळाली. त्यांना ४ हजार ६८५ मध्ये पडली होती, तर शिरोळे यांना ४ हजार १२५ मते मिळाली. त्यानंतर मात्र प्रत्येक फेरीत शिरोळे यांनीच आघाडी घेतली आणि मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला.
२०१९ चा निकाल
सिद्धार्थ शिरोळे (भाजप) – ५८,७२७
दत्ता बहिरट (काँग्रेस) – ५३६०३
अनिल कुऱ्हाडे (वंचित) – १०४५४
२०२४ चा निकाल
सिद्धार्थ शिरोळे (भाजपा) – ८४, ६९५
दत्ता बहिरट (काँग्रेस) – ४७,९९३
मनीष आनंद (अपक्ष) – १३,०६१
परेश शिरसंगे (वंचित) – २४४४





