Pune : वर्षात घटस्फोट मागणाऱ्या नवरोबाला झटका

पुणे – लग्न झाल्यावर वर्षात घटस्फोटासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्या नवरोबाला झटका बसला आहे. त्याचा अर्ज न्यायाधीश बी.डी.कदम यांनी फेटाळला आहे. हिंदू विवाह कायदा, कलम १४ नुसार विवाहानंतर वर्षाच्या आत घटस्फोटासाठी दावा दाखल करता येत नाही. ही बाब पत्नीच्या वकिलाने निदर्शनास आणून दिली. त्यानुसार सुनावणीपूर्वीच घटस्फोटाचा अर्ज फेटाळला. पत्नीतर्फे अॅड.पुष्कर पाटील, अॅड. प्रणव मते आणि अॅड.अमित केंद्रे यांनी काम पाहिले.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी दाम्पत्याची नावे आहेत. तो ३३ वर्षाचा असून, शासकीय नोकरीत उच्च पदावर आहे. ३० वर्षाची असून, खासगी नोकरी करते. सप्टेंबर २०२४ मध्ये दोघांचा विवाह झाला. लग्नानंतर दोघात वाद होऊ लागले. त्यामुळे हिंदु विवाह कायदा कलम १३ नुसार माधवने घटस्फोटासाठी अर्ज केला. त्याला पत्नीच्या वकिलांनी विरोध केला. कलम १४ हे विवाहसंस्थेच्या रक्षणासाठी खास करून समाविष्ट केलेले आहे.
घटस्फोटासाठी पात्र ठरण्यासाठी विवाहास एक वर्षाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा विवाहानंतर तात्काळ पती-पत्नींमधील छोट्या मतभेदांवरून वैवाहिक नातं मोडण्याची शक्यता असते. यामुळेच कायद्यात ही अट असल्याचे पत्नीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर न्यायालय म्हणते की, कलम १४ नुसार विवाहास वर्ष पूर्ण होण्याआधीची घटस्फोट याचिका कायद्यानेच निष्क्रिय मानली जाते. या याचिकेस कायदेशीर आधार नसल्याने ती स्वीकारता येणार नाही.
विवाहास वर्ष पूर्ण होण्याआधी कुणीही घटस्फोटासाठी याचिका दाखल करू शकत नाही. ही अट बंधनकारक आहे आणि न्यायालय त्याला अपवाद करू शकत नाही. त्यानुसार हा निर्णय झाला आहे. यामुळे पत्नीला दिलासा मिळाला आहे. -अॅड. पुष्कर पाटील, पत्नीचे वकील





