Pune: लष्कर न्यायालयाचे वानवडी भागात स्थलांतर

पुणे – ब्रिटीश काळापासून लष्कर भागात सुरू असलेले न्यायालय तात्पुरते वानवडीत येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. अपुरी जागा आणि बांधकाम जीर्ण झाल्याने हा निर्णय झाला आहे. वानवडी येथील पुणे महानगरपालिकेने निर्माण केलेल्या महात्मा फुले सांस्कृतिक भवनात हे न्यायालय स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे आता सोमवारपासून (दि. १०) लष्कर न्यायालयातील कामकाज नवीन ठिकाणी चालणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून या न्यायालयासाठी स्वतंत्र जागा देण्याची मागणी होत आहे. मात्र, नवीन जागा न मिळाल्याने आणि येथे कामकाज करणे शक्य नसल्याने न्यायालयात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यातआले आहे. पुणे जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत लष्कर भागात हे न्यायालय कार्यान्वित आहे. येथे पाच पोलीस स्टेशनचे कामकाज चालते. तेथे तब्बल ३० हजार हून अधिक खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे न्यायालय लवकरात लवकर एका प्रशस्त जागेत स्थलांतरित होणे गरजेचे आहे.
पुरेसे कोर्ट हॉल आणि आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसल्याने येथील दावे प्रलंबित राहत आहेत. प्रशस्त ठिकाणी न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यास पक्षकारांचे खटले आणि तक्रारीवर लवकरात लवकर निकाली लागून त्यांना न्याय मिळेल, अशी माहिती येथील वकील मंडळींनी दिली.
“लष्कर न्यायालय स्थलांतरित होत असताना वानवडी येथे केवळ तीन न्यायालये सुरू आहेत. येथे असलेल्या पाच पोलीस स्टेशनच्या प्रलंबित दाव्यांचा विचार करता येथे आणखी दोन न्यायालये सुरू करणे आणि कर्मचाऱ्यासह इतर पायाभत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे आणखी दोन न्यायालय् सुरू करणे गरजेचे आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालय, राज्य शासनाचा न्याय व विधी विभाग आणि पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे पाठपुरावा करत आहे.” – ॲड. के. टी. आरू-पाटील, माजी उपाध्यक्ष पुणे बार असोसिएशन व अध्यक्ष क्रिएटिव्ह सोशल फाउंडेशन
कोणत्या पोलीस स्टेशनचे येथे कामकाज चालते?
हडपसर, लष्कर, वानवडी, कोंढवा आणि व मुंढवा
प्रलंबित दाव्यांची संख्या : सुमारे ३० हजार





