Pune: शाडूच्या मातीचा होणार पुनर्वापर; गणेशोत्सवात यंदाही राबविणार पुनरावर्तन उपक्रम

पुणे – यंदाच्या गणेशोत्सवात महापालिका व विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती संकलित करून त्याचा पुर्नवापर केला जाणार आहे.
शाडू माती एक मर्यादित संसाधन असून, या मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. मातीच्या मूर्तींचे विसर्जन केल्यामुळे गाळ निर्माण होऊन तो नदीपात्रात साठल्याने सागरी जीवनावर परिणाम होतो. शाडू मातीचा पुनर्वापर केल्यास मूर्तिकारांना त्याची मदत होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
इको एक्झिस्ट संस्था, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था व इतर विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती व शाडू माती संकलनाच्या केंद्राविषयीची सविस्तर माहिती www.punaravartan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक गणेशोत्सव दिनांक ०७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत साजरा होत असून, पर्यावरणपूर गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले आहे. सोशल माध्यमांद्वारे, व्हीएडी, बॅनर्स, होर्डिंग्ज, पोस्टर्स आदींद्वारे जनजागृती करण्यात येत असून, कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये, असेही आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मूर्तींचे सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन
महापालिकेकडून शहरात संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन करण्याची व्यवस्था वाघोली येथील खाणीमध्ये करण्यात आली आहे. खाणीच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक नगररोड- वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयांकडून व सुरक्षाविभागाकडून रखवालदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार आवश्यक गाड्यांची उपलब्धता करून दिली जाणार असून, मूर्तींचे पुनर्विसर्जन सन्मानपूर्वक केले जाईल. याबाबत जिल्हाधिकारी, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ , पोलीस आयुक्त, तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याशी समन्वय ठेवण्यात येणार आहे.





