शांतता… पुणेकर वाचत आहेत उपक्रमाची विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल पुणे – वाचन चळवळीला बळकट करण्यासाठी आणि पुण्याला पुस्तकांची राजधानी बनवण्यासाठी राबविण्यालेल्या ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाने पुणेकरांच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडवले. केवळ तासाच्या वाचन उत्सवात साडेसात लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. हा उपक्रम विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आगामी पुणे पुस्तक महोत्सव अंतर्गत मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत हा महत्त्वाकांक्षी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे, रेल्वेस्थानके, मेट्रो, धार्मिकस्थळे, सार्वजनिक ग्रंथालये, शासकीय-खासगी कार्यालये आणि अगदी रिक्षा थांब्यांवरही पुणेकर आवडीच्या पुस्तकांमध्ये रमलेले दिसले. नागरिकांनी वाचन करतानाचे छायाचित्र पुणे पुस्तक महोत्सवाच्या लिंकवर अपलोड करून विक्रमात सक्रिय नोंद केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल १ लाख ३५ हजार २३८ हून अधिक नागरिकांनी वाचन करतानाचे फोटो अपलोड केले. या आकडेवारीनुसार महिलांनी पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. विशेष बाब म्हणजे १७ ते २२ वयोगटातील युवकांचा सहभाग सर्वाधिक होता, जो तरुणाईमध्ये वाचन संस्कृती रुजत असल्याचे दर्शवतो. एकूण सहभाग साडेसात लाखांहून अधिक असल्याचे पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले. या उपक्रमाची छाप केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही; तर नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनावरही उमटली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि अनेक मंत्री, खासदार, आमदार यांनी आवडीच्या पुस्तकांचे वाचन करून चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. गिनीज बुकमध्ये नोंद अपलोड केलेल्या सर्व छायाचित्रांचा उपयोग करून ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हे वाक्य तयार करत ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये विश्वविक्रमाची नोंद करण्यात येणार आहे. या विक्रमासाठी कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांचे पाठबळ लाभले आहे. वाचल्या गेलेल्या साहित्यप्रकारांमध्ये इतिहास, चरित्र, आत्मचरित्र आणि बालसाहित्याला सर्वाधिक पसंती मिळाली, तर ‘छत्रपती शिवाजी महाराज (चरित्र)’, ‘श्यामची आई’, ‘रिच डॅड पूअर डॅड’ आणि ‘अॅटॉमिक हॅबिट्स’ ही पुस्तके सर्वाधिक लोकप्रिय ठरली.