Pune: बीबीए, बीसीए प्रवेशासाठी सहा सप्टेंबरपर्यंत मुदत

पुणे – राज्यातील बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ६ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. दि. १६ सप्टेंबरला गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज्य सीईटी सेलकडून प्रवेशाची माहिती देण्यात आली. बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए अभ्यासक्रमासाठी यंदा पहिल्यांदाच सीईटी सेलकडून राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत दोन वेळा सीईटी घेण्यात आली असून, बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए या अभ्यासक्रमांसह एकात्मिक एमबीए, एमसीए अभ्यासक्रमांचीही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सीईटी सेलच्या माहितीनुसार बारावी उत्तीर्ण असलेल्या, एआयसीटीई मान्यताप्राप्त पदविका उत्तीर्ण असलेल्या, सीईटीमध्ये, तसेच केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षेत (सीयूईटी-युजी) ‘नॉन झिरो पॉझिटिव्ह स्कोअर’ असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. विद्यार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करून ई पडताळणी करून घ्यावी. सविस्तर माहिती सेलच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.




