Pune : अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे : कोथरूड भागातील डीपी रस्त्यावर भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील १२ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीस्वार आई जखमी झाली. घटनास्थळावरून पसार झालेल्या मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अबीर प्रणव पानसे (वय १२, रा. रामबाग काॅलनी, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. अपघातात दुचाकीचालक प्रियंका प्रणव पानसे (वय ४४) या जखमी झाल्या. याबाबत प्रियंका यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार यांनी दिली. अबीर हा कोथरूड भागातील एका शाळेत सातवीत शिकत होता.
मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास प्रियंका यांच्यासोबत अबीर दुचाकीवरून कोथरूड भागातील डीपी रस्त्यावरून निघाला होता. शांतिबन सोसायटीकडून आशिष गार्डन चौकाकडे निघालेल्या भरधाव मोटारीने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये प्रियंका आणि अबीरला गंभीर दुखापत झाली. दोघांनाही नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
उपचारांदरम्यान अबीरचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ, तसेच शांतीबन सोसायटी ते आशिष गार्डन चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. सहायक निरीक्षक संदीप पवार तपास करत आहेत.





