पुणे : किलबिलाट आजपासून; शिशुवर्ग सुरू होणार, पण पालकांमध्ये धाकधूक

पुणे –सर्व शाळांचे शिशुवर्ग दि. 2 मार्चपासून भरणार आहेत. पण, उन्हाळी सुट्या लक्षात घेता जेमतेम दोनच महिने शाळा आहे. तर मुलांना शाळेत का पाठवायचे ऑनलाइनचा ऑप्शनच निवडू? असा विचार बहुतांश पालक करत आहेत. “मुलांचे करोना प्रतिबंधक लसीकरण झाले नाही तर त्यांना शाळेत पाठवू नये,’ असाही काही पालकांचा सूर येत आहे. “परंतु असे करू नका, मुलांना अवश्य शाळेत पाठवा’ असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
करोनाच्या तिन्ही लाटांत मुलांना फार कमी प्रमाणात हानी पोहोचली. मोठ्यांइतके किंवा सहव्याधी असणाऱ्यांपेक्षा मुलांची शारीरिक क्षती खूप कमी होती. आता घरातील सर्वांचे लसीकरण झाले आहे. तसेच, शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचेही लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुलांना सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे, असा दावाही तज्ज्ञ करत आहेत.
2 ते 14 या वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरू झाले नाही. परंतु एकूणच 15 च्या पुढील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्याचे त्याचे सकारात्मक परिणाम जगभरात झालेल्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहेत. तिसरी लाट ही मुलांसाठी धोकादायक आहे, असे म्हटले होते. परंतु ती तेवढी धोकादायक ठरली नाही. मुलांचे लसीकरण करायला हवे यावर सर्वच बालरोगतज्ज्ञांचे एकमत आहे. शाळांमध्येही ते झाले पाहिजे, परंतु त्यासाठी मुलांना शाळेत पाठवायचेच नाही ही मात्रा नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
प्राधान्याने कोणाला लस दिली पाहिजे?
करोना प्रतिबंधक लसीकरण भविष्यातही लहान मुलांना उपयुक्त ठरेल. अति-जोखीम असलेल्या मुलांचे लसीकरण केलेच पाहिजे. लठ्ठ मुले, मधुमेही, तीव्र स्वरूपाचा आटोक्यात न येणारा दमा, हृदयासंबंधी आजार, स्टिरॉइड्स सुरू असलेली तसेच, कोणत्याही कारणांनी रोग प्रतिकारक शक्ती खालावलेली मुले यांना प्राधान्याने लस दिली पाहिजे. मुलांना करोना झाल्यानंतर उपचारांत गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असल्याने अशा मुलांना शाळेत पाठवण्याबाबत बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र “पेडियाट्रिक टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. प्रमोद जोग यांनी केले.





