नवीन स्वरूपात सातबारा उतारा अनावश्यक नोंदी केल्या कमी

पुणे- शेतकऱ्यांना स्वत:च्या पिकांची नोंद स्वत: घेता यावी, यासाठी शासनाने ई-पीक पाहणी हा अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हा उपक्रम भविष्यात महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच सरकारने नवीन स्वरुपात सातबारा आणला असून अनावश्यक नोंदी कमी केल्या आहेत. या दोन्ही उपक्रमांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्याची प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.
दोन वर्षे करोनात गेल्यानंतर महसूल विभागासंदर्भात आढावा बैठक घेण्यात येत आहेत. अनेक विभागांची कामे महसूल विभागाशी निगडीत असतात. त्यामुळे आपल्या मूळ विभागाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. महसूल विषयक बाबींचा प्रशासनाने नियमित आढावा घ्यावा. ई-पीक पाहणीच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्राचा हा उपक्रम राजस्थानने त्वरीत स्वीकारला असून देशपातळीवर सुद्धा या उपक्रमांची दखल घेतली जाईल. या उपक्रमासाठी कृषी विभागाची मदत घ्यावी. तसेच ई-पीक पाहणी हा शेतकऱ्यांचा सवयीचा भाग झाला पाहिजे, यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशा सूचना थोरात यांनी दिल्या.





