पुणे – विधानसभा निवडणुका आणि निकालाच्या कामासाठी नेमण्यात आलेले महापालिकेचे अनेक कर्मचारी ही दोन्ही कामे संपली असली, तरी कार्यालयात वेळेत येत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या अनेक विभागांमध्ये शुकशुकाट असून, दैनंदिन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना महापालिकेत हेलपाटे घालावे लागत असल्याचे चित्र आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकालही जाहीर झाला आहे. ही कामे संपूनही काही कर्मचारी वगळता निवडणूक आयोगाने उर्वरीत कर्मचारी महापालिकेत परत पाठविले आहेत. मात्र, हे कर्मचारी वेळेचे कोणतेही बंधन पाळत नसून, सकाळी उशिरा येऊन संध्याकाळी लवकर गायब होत आहेत. अनेक जण दिवसभर महापालिकेकडे फिरकतच नाहीत. हे कर्मचारी नेमके आहेत तरी कुठे, असा प्रश्न आता विभागप्रमुखांनाही पडला आहे. महापालिकेचे सुमारे साडेपाच हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी नेमले होते. त्यातील ७५ टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामातून मुक्त झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. ऑनलाइन हजेरी नावालाच? महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी घेतली जाते. मात्र, ही प्रणाली वेतनाशी जोडण्यात आलेली नाही. अनेकदा ही प्रणाली बंदही असते अथवा त्यासाठी वीज पुरवठा करणाऱ्या केबल काढून टाकलेल्या असतात. त्यामुळे या प्रणालीद्वारे नेमकी हजेरी मिळत नाहीत. त्यामुळे अनेक विभागांत अद्यापही रजिस्टरवर हजेरी घेऊन त्यानुसार वेतन काढले जाते. बिल क्लार्कला हाताला धरून अनेक जण उशिरा येऊनही हजेरी लावतात. प्रत्यक्षात कामाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत आहे. मात्र, अनेक कर्मचारी ११ नंतर येऊन वेळेआधीच गायब होतात. मात्र, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्याने हे प्रकार वाढतच आहेत. नागरिकांच्या कामांचा खोंळबा आपल्या दैनंदिन कामासाठी अनेक नागरिक महापालिकेच्य वेळेनुसार पालिकेत येतात. मात्र, सकाळी दहा वाजता आलेल्या नागरिकांना दुपारी बारा ते एक पर्यंंत कर्मचाऱ्यांची वाट पहावी लागत थांबावे लागते. तर, अनेकदा साहेब निवडणूकीच्या कामात गेल्याचे सांगत नागरिकांंना ताटकळत ठेवले जात आहे. जवळपास सर्वच विभागात हे चित्र असून अनेकदा बैठका तसेच साईट व्हीजीटसाठी बाहेर गेलेल्या विभाग प्रमुखांना याची कोणतीही कल्पना नसल्याने त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीकडे लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे.