PUNE: शाळा परिसरात तंबाखू विक्री; ‘मोक्का’ लावण्याचा प्रस्ताव

पुणे – राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ मिळू नये म्हणून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जरब बसविण्यासठी राज्यातील संबंधित यंत्रणा व पालकांची एक संयुक्त बैठक घेऊन कडक कायदा करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी ‘मोक्का’ लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विधानपरिषदेत दिले.
राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसंदर्भात एक लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना आत्राम बोलत होते. राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास शासनाने मनाई आदेश लागू केला आहे. शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके निर्माण करण्यात येणार असल्याचे आत्राम यांनी सांगितले.





