PUNE: कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ होणार?

पुणे – वैद्यकीय उपचारांद्वारे रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी कंत्राटी डॉक्टर करत असलेले कार्य महत्वाचे असून, वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी वित्त विभागाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
बी. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातील विविध विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, आमदार सुनील कांबळे, रवींद्र धंगेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, प्लेग, स्वाइन फ्ल्यू, कोविडसारख्या काळात ससून रुग्णालयाने उत्तम रुग्णसेवा केली. रुग्णालयाच्या नव्या इमारतीवर १८३ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. रूपाली चाकणकर म्हणाल्या, येथे नव्या स्वतंत्र वॉर्डमुळे तृतीयपंथीयांना सन्मान मिळेल. राज्य महिला आयोगाने या वॉर्डसाठी पुढाकार घेतला. समाज नेहमी तृतीयपंथीयांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. काळे यांनी प्रास्ताविकात नव्या इमारतीमुळे ५७० खाटा उपलब्ध झाल्याने रुग्णालयात एकूण १ हजार ९०० खाटांची सुविधा उपलब्ध झाल्याचे सांगितले. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दृकश्राव्याद्वारे शुभेच्छा दिल्या. तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधी चांदणी गोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
या सुविधांचे लोकार्पण
उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते ससून सर्वोपचार रुग्णालयाची नूतन इमारत, अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेले शवागार, कर्करोगाच्या निदानासाठी वापरण्यात येणारे पेटस्कॅन आणि नूतनीकरण केलेल्या मैदान, सीएसआर निधीतून उभारलेल्या सुविधांचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.
“ससून रुग्णालयाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता रुग्णालय इमारतीच्या विस्तारासाठी आवश्यक जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल. ससून रुग्णालयात काळानुसार आवश्यक बदल करण्यासाठी अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयातील उत्तम सुविधांचा अभ्यास करून एका महिन्यात आवश्यक बाबींसाठी प्रस्ताव सादर करावा.” – अजित पवार, उपमुख्यमंत्री





