Pune : संचलन तूटीचे ३१ कोटी पीएमपीला देणार

पुणे : पीएमपी संचलन तूटीच्या शेवटच्या हप्त्यासाठी ३१ कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. महापालिकेकडून दरवर्षी ११ समान हप्त्यांमध्ये ही संचलन तूट दिली जाते. त्याचा शेवटचा हप्ता मार्च अखेरीस दिला जातो. त्यानुसार, हा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे.
पीएमपीची संचलनतूट मागील वर्षी ७०६ कोटी झाली आहे. ही तूट भरून देण्यासाठी पुणे महापालिकेने ६० टक्के आणि ४० टक्के पिंपरी-चिंचवड महापालिकेने देणे राज्यशासनाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार, महापालिकेने ४२३ कोटी ८१ लाख रूपये पीएमपीला द्यायचे आहेत. त्यात आता पर्यंत उचल, तसेच प्रत्येक महिन्यात समान हप्त्यांमध्ये महापालिकेने पीएमपीला मार्गाल वर्षभरात ३९२ कोटी ४९ लाख रूपये दिले आहेत.
उर्वरीत ३१ कोटी ३१ लाख रूपयांमधून महापालिकेने पीएमपीला वेगवेगळया कामांसाठी छपाई करून दिलेल्या साहित्याचे ४९ लाख ४६ हजार रूपये वजा करून उर्वरीत ३० कोटी ८१ लाख रूपये देण्याचा प्रस्ताव स्थायीत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे, पीएमपीला मार्च अखेरीची देणी देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.





