Pune : ब्रेन ट्युमरवर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे : ब्रेन ट्युमरचे निदान झालेल्या ६० वर्षीय महिलेवर न्यूरोसर्जन टीमने पुण्यातील पहिली रोबोटिक असिस्टेड ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली, असा दावा पुण्यातील रूबी हाॅल क्लिनिकने केला आहे. मेंदू विकार शस्त्रक्रिया क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा असून, मेंदू शल्यचिकित्सक डॉ. आनंद काटकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. राहुल शर्मा, भूलतज्ञ डॉ. नंदिनी लोंढे आणि टीमने शस्त्रक्रिया केली. त्यामध्ये अचूकता साधत, कमीत कमी छेद आणि कमी रक्तस्रावामुळे रुग्णाला बरे होण्यासाठीचा कालावधी कमी झाला.
६० वर्षीय महिलेला खोलवर असलेल्या ब्रेन ट्युमरचे निदान झाले. यातील गुंतागुंत आणि ट्युमरचे ठिकाण लक्षात घेता न्यूरोसर्जिकल टीमने रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला. पारंपरिक प्रक्रियेत अनेकदा दीर्घकाळ चालणारी शस्त्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ९० मिनिटांत पूर्ण झाली, तसेच रुग्णाची तब्येतही लवकर बरी झाली.
मेंदू शल्यचिकित्सक डॉ. आनंद काटकर म्हणाले, की रोबोटिक तंत्रज्ञानामुळे गुंतागुंतीची जोखीम कमी होते. कमी रक्तस्राव होतो आणि रुग्णही लवकर बरा होतो. आम्ही केलेली ही शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानाचे साहाय्य न्यूरो सर्जरी क्षेत्रात कसे परिवर्तन घडवत आहे, याचा पुरावा आहे. न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अशोक भणगे म्हणाले, या तंत्रज्ञानामुळे शल्यचिकित्सक मेंदूच्या नाजूक संरचनेतून अचूकतेने मार्ग काढू शकतात व यामुळे प्रक्रियेची एकंदर कार्यक्षमता सुधारते.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रांट म्हणाले, आम्ही रुग्णांसाठी सर्वांत प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान सेवा प्रदान करण्यास प्राधान्य दिले आहे. रोबोटिक असिस्टेड ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया ही शल्यचिकित्सा क्षेत्रातील उत्कृष्टता आणि रुग्णकेंद्रित चिकित्सा आहे. न्यूरोसर्जिकल उपचारातील ही एक नवी सुरुवात आहे.




