Pune: रस्ते बंद, पण मेट्रो आहे ना…

पुणे – शहरात रविवारी ( दि.३० जून ) रोजी पालखी सोहळ्यामुळे दुपारनंतर शहरातील शहरातील रस्ते टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले. त्यामुळे, शहरांतर्गत प्रवासासाठी मेट्रोच्या प्रवासाला पसंती दिली असल्याचे समोर आले आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल १ लाख ९९ हजार ४३७ प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला आहे.
यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील प्रवाशांसह वारकऱ्यांचाही समावेश आहे. तसेच या दिवशी महामेट्रोला २४ लाख १५ हजार ६९३ हजार रूपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतरचे हे सर्वाधिक प्रवासी आणि सर्वाधिक उत्पन्न असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
रविवारी पीसीएमसी मेट्रो स्थानकात सर्वाधिक १९,९१९ प्रवाशांची नोंद झाली, त्यापाठोपाठ पीएमसी १८,०७९ , शिवाजीनगर (१७,०४६), पुणे रेल्वे स्थानक (१५,३७८) आणि रामवाडी (१४,७७०) येथे प्रवाशांची सर्वाधिक नोंद झाली. याव्यतिरिक्त, जिल्हा न्यायालय स्थानकावरून सुमारे ५१,०२६ प्रवाशांनी त्यांची मार्गिका बदलली. मेट्रोची दररोजची संचलनाची वेळ रात्री १० पर्यंत असली, तरी रविवारी मात्र दहानंतरही स्थानकावर प्रवाशांच्या रांगा असल्याने महामेट्रोकडून रात्री ११ पर्यंत मेट्रोचे संचलन सुरू ठेवण्याचा निर्णय आयत्या वेळी घेण्यात आला.
“प्रवाशांना सुरक्षित, कार्यक्षम व आरामदायी प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी महामेट्रो कटीबध्द आहे. आम्ही आमच्या मार्गांचा विस्तार आणि वाढ करत आहोत. पुणे मेट्रोला शहरी वाहतुकीचा एक घटक होण्याच्या दिशेने मेट्रोचा प्रवास सुरू आहे.” – डाॅ. श्रावण हार्डीकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक
वारकऱ्यांनाही उत्सूकता…
मागील वर्षी पालखीवेळी मेट्रोचा केवळ वनाज ते गरवारे महाविद्यालय हा मार्ग सुरू होता. मात्र, या वर्षी पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट पर्यंत मेट्रो सुरू झाल्याने अनेक वारकऱ्यांनी पुण्यात येण्यासाठी मेट्रोचा वापर केला. या शिवाय, सोमवारी पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी असल्याने अनेक वारकऱ्यांनी मोठया उत्सूकतेने मेट्रोमधून प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.





