Pune: रस्ता पूर्णपणे उखडला; ऊंड्री-वडाचीवाडीत खड्डेच खड्डे

कोंढवा – उंड्री-वडाचीवाडी रस्त्यावर खड्डेच खड्डे आणि पाण्याची मोठी डबकी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. महापालिकेत गावे जावुन अनेक वर्षे उलटली तरीही सुविधा मिळत नसल्याने पालिकेचे हेच का अच्छे दिन. असा सवाल येथील नागरीकांकडून केला जात आहे.
वडाचीवाडी रस्ता पूर्णपणे उखडल्याने वाहनचालक तसेच नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. पालिका प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येइल, असा इशारा उंड्रीचे माजी सरपंच निवृत्तीआण्णा बांदल यांनी दिला आहे.
महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे उंड्री, वडाचीवाडी येथील मुख्यरस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. पावसाळी लाइन नसल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वाहनचालकांसह शाळकरी विद्यार्थी आणि पादचाऱ्यांची पायवाट बंद झाली आहे. अनेक ठिकाणी उतारावरील रस्त्यावर खड्डे असल्याने पावसाचे पाणी साचून राहते.
वाहनचालकांना चेंबर आणि रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघातही होत आहेत. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यातून वाहनांवरचे नियंत्रण सुटुन अपघात घडत आहेत. पालिका प्रशासनाने तत्काळ उंड्री-वडाचीवाडी रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येइल. असा इशारा उंड्रीचे माजी सरपंच निवृत्तीआण्णा बांदल यांनी दिला आहे.





