Pune : तापमान वाढीमुळे पक्षांच्या स्थलांतरावर परिणाम

पुणे : उन्हाळ्याची चाहूल लवकरच लागल्याने तापमान वाढले आहे. यामुळे पक्षांच्या स्थलांतरावर परिणाम झाला असून, वेळेआधीच ते परतीच्या मार्गाला लागल्यचे निरीक्षण पक्षीनिरीक्षकांनी नोंदवले आहे. यावर्षी, केवळ पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळा लवकर सुरू झाला आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून दिवसा आणि रात्रीचे तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त नोंदवले जात आहे.
पुणे शहराचे स्थान, हवामान आणि जवळपासच्या नैसर्गिक अधिवासामुळे हे अनेक पक्षी प्रजातींसाठी एक आकर्षणाचे स्थान बनले आहे. दरवर्षी युरोप, आफ्रिका, हिमालयीन प्रदेश आणि इतर अनेक ठिकाणाहून ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत हिवाळ्यात पुण्यात शेकडो स्थलांतरित पक्षी येतात. हे पक्षी साधारणत: मार्च अखेरपर्यंत मुक्काम करतात आणि उन्हाळा सुरू झाल्यावर परतीचा प्रवास सुरू करतात. मात्र या वर्षी तापमान वाढीमुळे त्यांचा परतीचा प्रवास लवकर सुरू झाला आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पक्षी निरीक्षकांनी स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींच्या दर्शनात लक्षणीय घट अनुभवली आहे.
वाढत्या तापमानाच्या परिस्थितीशी त्याचा संबंध असू शकतो. हा ट्रेंड म्हणून प्रस्थापित करता येत नसला तरी पॅटर्न आहे, असे शहरस्थित पक्षी निरीक्षक आणि ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट इनिशिएटिव्हचे समन्वयक रणजीत राणे यांनी सांगितले. पुण्यात टेकड्यांवर सर्रास आढळणारे छोटे स्थलांतरित पक्षी आता दिसत नाहीत. या हिवाळ्यात वेताळ टेकडीवर मोठ्या संख्येने आढळणारे सँड पायपर पक्षी आता दिसले नाहीत. याशिवाय याच परिसरात लार्क्स पक्ष्यांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, असे निरीक्षणही राणे यांनी नोंदवले.
हवामान बदलाचा जागतिक स्तरावर पक्ष्यांच्या प्रजातींवर मोठा परिणाम होत आहे. यासंबंधीचा अभ्यास विविध संस्था आणि संशोधन संस्थांनी केला असून, स्थलांतरित पक्षी हवामानातील बदलाचा अवलंब करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पक्षी नैसर्गिक परिस्थितीचे पालन करत असल्याने लवकर अरायव्हल आणि लवकर निघून जाणे आपण पाहू शकतो, असे पुणे वन विभागाचे उप वनसंरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण यांनी सांगितले.





