पुणेकरांची चिंता मिटली ! दहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा धरणसाखळीत

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीचा पाणीसाठा ४८ टक्के ( १४ टीएमसी) झाला आहे. त्यामुळे जुलैच्या दमदार पावसाचा प्रवेश होण्यापूर्वीच शहराची दहा महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. पाणलोट क्षेत्र आणि घाटमाथ्यावर चांगला पाऊस पडत असल्याने दैनंदिन पाणीसाठयात चांगली वाढ होत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. मागील वर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा अवघा ३. ६७ टीएमसी होता. गतवर्षाच्या तुलनेत यंदा तीनपट अधिक पाणीसाठा आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील उपयुक्त पाणी साठवण क्षमता २९.५० टीएमसी आहे. या धरणातून पुणे शहर तसेच जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी पाणी सोडण्यात येते. या धरणातील दीड टीएमसी पाणी महिनाभरासाठी पालिकेस आवश्यक असते. यंदा पावसामुळे चारही धरणांमध्ये जून अखेरीस हा पाणीसाठा तयार झाला आहे.
प्रत्येक वर्षी जून महिन्यात मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली तरी जुलैच्या दुसऱ्या आठवडयानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही धरणे भरली जातात. मात्र, यंदा पूर्वमोसमी पावसाने महिनाभर लावलेली हजेरी आणि त्या नंतर लगेचच दाखल झालेल्या मान्सूनने या चारही धरणांच्या पाणीसाठयात वाढ झाली. परिणामी ही धरणे जूनअखेरीस ४८ टक्के भरली आहेत. त्यामुळे तूर्तास शहराची दहा महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.
जूनची सरासरी ओलांडली
चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. जूनअखेर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ९९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७४१ मिमी, पानशेत ७३९ तर खडकवासला धरणाचा पाणलोट क्षेत्रात ३२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरण १८ जून रोजी भरल्यानंतर आता पर्यंत धरणातून मुठा नदीत २.४७ टीएमसी पाणी सोडले आहे.
अशी आहे आजची स्थिती
खडकवासला – ६४ टक्के
पानशेत – ४४ टक्के
वरसगाव – ५२ टक्के
टेमघर – ३४ टक्के





