पुणेकरांनो लक्ष द्या! धूळवड सणामुळे पुणे मेट्रोची सेवा ‘या’ वेळेत राहणार बंद; जाणून घ्या वेळापत्रकातील बदल

पुणेः आज धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पुणे मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. दुपारी ३ नंतर मेट्रो सेवा पुन्हा सुरू होईल असे देखील सांगण्यात आले आहे. या संबंधीचे प्रसिद्धीपत्रक मेट्रो प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
धूलिवंदन हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. पुणे शहरातील धूलवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. धूळवडीमुळे नागरिक रस्त्यावर एकत्र येत रंगांची उधळण करून हा सण साजरा करतात. यामुळे मोठी गर्दी होते. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत जरी मेट्रो सेवा बंद असली तरी दुपारनंतर पुन्हा ती सुरू करण्यात येणार आहे. यामुळे ३ ते ११ वाजेपर्यंत नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
धुळवडीच्या दिवशी मेट्रो प्रवासाची पूर्वतयारी करून नियोजन करावे. तसेच ज्या प्रवाशांना सकाळच्या वेळेत प्रवास करायचा आहे, त्यांनी अन्य पर्यायांचा विचार करावा, असे आवाहन पुणे मेट्रोच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.





