Pune : दक्षिण पुण्यातील आठ लाख पुणेकरांना दिलासा

१२५ एमएलडी क्षमतेच्या नवीन जल शुद्धीकरण प्रकल्पास मान्यता
पुणे – शहराच्या दक्षिण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता आता दुपटीने वाढणार आहे. अस्तित्वातील १३७ एमएलडी क्षमतेच्या केंद्रासोबतच या ठिकाणी असलेल्या जागेत नवीन १२५ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यास महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या वाढीव क्षमतेचा फायदा दक्षिण पुण्यातील तब्बल ८ लाख २० हजार पुणेकरांना होणार आहे. सध्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून दिले जात असलेले पाणी अपुरे पडत असल्याने कात्रज परिसरातील अनेक भागांत आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाते. मात्र, या केंद्राचे काम झाल्यानंतर ही पाण्याची समस्या कायमची संपणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २२४ कोटी ८७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच, अडीच ते तीन वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. केंद्र शासनाकडून या प्रकल्पासाठी अमृत २.० अंतर्गत निधी दिला जाणार आहे.
८ लाख पुणेकरांना होणार फायदा
महापालिकेकडून सध्याच्या अस्तित्वातील वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून कात्रजपासून पुढे, महंमदवाडी, धनकवडीचा काही भाग, तसेच सिंहगड रस्ता परिसरात पाणी पुरवठा केला जातो. त्यातच, वर्षभर या जलकेंद्रावरून पाणी दिल्या जाणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने तसेच पाण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी असल्याने अनेक ठिकाणी पाणीच पोहचत नाही. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात या जलकेंद्रावरून पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या भागात आठवड्यातून एक दिवस चक्राकार पद्धतीने पाणी दिले जाते तर काही भागांत वर्षभर एक दिवस पाणी बंद असते.
त्यामुळे महापालिकेलाही नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. त्यातच आता या भागासोबत आता कोळेवाडी, जांभूळवाडी, गुरज निबांळकरवाडी, मांगडेवाडी. सिंहगड रस्ता काही भाग नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेला आहे. तसेच, महापालिकेकडून समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत या भागात पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ही दोन्ही कामे एकाच वेळी पूर्ण होणार असल्याने त्याचा फायदा तब्बल आठ लाख पुणेकरांना होणार आहे.
शहराच्या दक्षिण भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी या प्रकल्पाची क्षमता वाढविली जाणार आहे. सध्या या केंद्रावरून सिंहगड रस्ता तसेच कात्रज परिसराला पाणी दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात नळजोडांची संख्या अधिक असल्याने अनेक भागांत कमी दाबाने तर काही भागांत दिवसाआड पाणी दिले जाते. त्यामुळे, या परिसरासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
– नंदकिशोर जगताप (पाणी पुरवठा विभाग प्रमुख)





