Pune : थकीत बिलाची सुरक्षा ठेवीतून वसुली

पुणे – वीजबिल थकविणाऱ्या ग्राहकांकडून वीजबिलाची वसुली करण्यासाठी महावितरणने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार जर वीज ग्राहकाने सलग दोन महिने वीजबिल भरले नाही, तर तिसऱ्या महिन्यात थकीत रक्कम थेट ग्राहकांच्या महावितरणकडे असलेल्या सुरक्षा ठेवीतून वसूल करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दि. 15 जुलैपासून सुरू झाली आहे.
या निर्णयामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना थेट ग्राहकांकडे जाऊन वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रमाण कमी होणार आहे. याशिवाय वीज बिल वसुली वाढल्याने कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. यापूर्वी सलग दोन महिने देयक न भरल्यास तिसऱ्या महिन्यात ग्राहकाला पंधरा दिवसांची नोटीस दिली जात होती.
त्यानंतरही देयक न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जात होता. मात्र, त्या वेळी ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीतून रक्कम वळती केली जात नव्हती. आता मात्र ती रक्कम थेट वसूल केली जाणार आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
थकबाकीवरील नियंत्रणासाठी
दोन महिने वीजबिल न भरल्यास ग्राहकास तिसऱ्या महिन्यात ठेवीतून वसुली नंतर सुरक्षा ठेव पुन्हा भरावी लागणार; अन्यथा सेवा खंडित केली जाणार आहे. मोठ्या थकबाकीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असून, याद्वारे महावितरण कंपनीच्या आर्थिक स्थैर्याला बळकटी देण्यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.





