Pune : अलिकडे कोणीही राज्यात नाट्यगृहे बांधतो – प्रशांत दामले

पुणे – ज्यांना नाट्यगृहांबद्दल काहीही माहिती नाही, असे लोक राज्यात नाट्यगृह बांधत आहेत, अशी खंत अभिनेते आणि अ.भा मराठी नाट्य परिषदचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी मंगळवारी व्यक्त केली. सुधारणा करण्यापेक्षा आधीच सुसज्ज, योजनबद्ध नाट्यगृह बांधली पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व परिवाराने ज्येष्ठ सिने- नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, डॉ. संजय चोरडिया, चंदुकाका ज्वेल्सचे सिद्धार्थ शहा, अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, बारामती नाट्य परिषदेचे अध्यक्ष किरण गुजर, बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, प्रशासन अधिकारी राजेश कामठे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते.
दामले म्हणाले, राज्यातील नाट्यगृहांसंदर्भात पुढील अडीच वर्षांसाठी शासनाने एक आराखडा तयार केल्यास नाट्यगृहे नीट होतील. मोहोळ म्हणाले, लीलाताई या पुण्याच्या कलेचे वैभव आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आपणा सर्वांचा सन्मान आहे. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा अशी शिफारस आपण केंद्राकडे करू.
लीलाताई म्हणाल्या, वयाच्या नवव्या वर्षांपासून मी कलाक्षेत्रात असून, आजतागायत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांत काम केले आहे. समर्थपणे लावणी सादर केल्यानेच अनेक घरंदाज मुली आजही लावणी करायला तयार असतात.
या वेळी फोटोग्राफर अक्षय परांजपे, पत्रकार कल्याणी फडके- केळकर, नाट्यनिर्माते पत्रकार अशोक घावटे, लेखक जयराम पोतदार, गायिका आशा खाडीलकर आदींना बालगंधर्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजेभोसले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. आभार चित्रसेन भवार यांनी मानले.





