Pune: रमेश बागवेंना पुन्हा संधी द्यावी; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचे मतदारांना आवाहन

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षांत पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या विकासासाठी काहीही केले नाही. महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश बागवे यांनी या मतदारसंघाचा मोठा विकास केला असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मतदारांनी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी सोमवारी केले. रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ रेड्डीच्या यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
रेड्डी म्हणाले, की महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण अशांनी पक्षाची साथ सोडली, त्यांना धडा शिकवला पाहिजे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे असून, त्यासाठी रमेश बागवे यांना विजयी करा. त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, युवक, महिला, तसेच मागासवर्गाला न्याय मिळेल. या निवडणुकीत महाविकास आघाडी निश्चित विजयी होणार असून, बागवे यांच्या विजयानंतर जल्लोष व्यक्त करण्यासाठी मी पुन्हा येथे येईन, असेही ते म्हणाले.
बागवे यांच्या प्रचाराची सांगता
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बागवे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाऴासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मंगळवार पेठेतील कडबाकुट्टी चौक येथे जाहीर सभा झाली. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारे व विकासाची दृष्टी असणारे रमेश बागवे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे प्रारंभीच आवाहन करून सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली.
सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या महायुतीला धडा शिकवण्याची ही वेळ असून, या निवडणुकीत विकासाची दृष्टी आणि अनुभव असणाऱ्या बागवेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.





