Pune Rain Update: पुण्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ! अनेक भागांत पूरसदृश स्थिती; जनजीवन विस्कळीत
Pune Rain Update: रस्त्यांवर पाण्याचे लोंढे साचल्याने चौकाचौकांत वाहतूक कोंडी; पीएमपीएल आणि एसटी बसचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत.

Pune Rain Update – शहर आणि उपनगरांमध्ये गुरुवारी (दि. ३०) मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावत धुमाकूळ घातला. शुक्रवारची पहाटेच मुसळधार पावसाने झाल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणांची मोठी तारांबळ उडाली. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणसाखळीतून विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. शहराच्या मध्यवर्ती भागासह कोथरूड, वारजे, धायरी, सिंहगड रोड, आंबेगाव, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, हडपसर, मगरपट्टा, विश्रांतवाडी, येरवडा, खराडी, औंध आणि पाषाण या सर्वच उपनगरांना पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत असल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.
अनेक प्रमुख चौकांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. रस्त्याकडेला असलेली दुकाने आणि सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी घुसल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले, तर गाड्यांमध्ये पाणी गेल्याने नागरिकांचे हाल झाले. गुरुवारी (दि. ३०) रात्रीपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे आज शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली.
चिंचवड परिसरात सर्वाधिक ७० मिमी पाऊस पडला. त्यापाठोपाठ शिवाजीनगर येथे ५० मिमी, पाषाण येथे ४९, लोहगाव येथे ४०, तर कोरेगाव पार्क परिसरात ३७ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळनंतर मात्र शहराच्या मध्यवर्ती भागासह काही उपनगरांमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र, अधूनमधून आलेल्या पावसाच्या हलक्या सरींमुळे नागरिकांनी संध्याकाळी घराबाहेर पडणे टाळले.
ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने पुणेकरांची दाणादाण उडाली. रस्त्यांवर साचलेले पाणी आणि खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमालीचा मंदावला होता. याचा सर्वाधिक फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसला. चौकाचौकांत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे पीएमची आणि एसटी बस सेवेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. परिणामी बसथांब्यांवर प्रवाशांची गर्दी झाली होती.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय झालेला पाऊस (सकाळी ८ ते सायंकाळी ५.३०)
खडकवासला– ५७, ढोले पाटील रोड- १९, येरवडा-कळस – ८, वडगावशेरी- नगररोड – १६, औंध-बाणेर – २९, कोथरूड-बावधन – ४१, शिवाजीनगर-घोले रोड – २८, वारजे-कर्वेनगर – ३९, सिंहगड रोड – ३६, वानवडी-रामटेकडी – ३१, कोंढवा-येवलेवाडी – ३१, हडपसर-मुंढवा – १६, भवानी पेठ – ३३, बिबवेवाडी – २९, कसबा-विश्रामबाग – ३८ मिलिमीटर.






