Pune Rain – शहर आणि परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने पुणेकरांची दैना उडवली असून, रस्ते देखील जलमय झाले. अवघ्या तासभर चाललेल्या या वादळी पावसाचा मोठा फटका महावितरणच्या वीज यंत्रणेला बसला असून, अनेक भागांतील अतिउच्चदाब आणि उच्चदाब वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने शहर अंधारात बुडाले आहे. झाडे पडणे आणि फिडर बॉक्समध्ये पाणी शिरल्याने निर्माण झालेला हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दुपारी अचानक आलेल्या वादळामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. ज्याचा थेट परिणाम वीजवाहिन्यांवर झाला. कोथरूड भागात कुंदनगरी फिडरवर वीज पडल्याने वीज रोखणारी यंत्रणाच निकामी झाली होती. Pune Rain Update या भागात आता केवळ २ रोहित्र बंद आहेत. नांदेड सिटी अतिउच्चदाब वाहिनीवर बिघाड झाल्यामुळे अर्ध्या तासासाठी कोथरूड विभागातील वीजपुरवठा बाधित झाला होता. मात्र, महावितरणने पर्यायी मार्गाने या भागातील पुरवठा पूर्ववत केला आहे. शिवाजीनगर विभागातील विद्यापीठ, खडकी, बावधन आणि बाणेर परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. धनकवडी, बाणेर, शहरातील काही मध्यवर्ती भाग, कोथरूडसह शहरातील काही भागांत जवळपास तीन-चार तास वीजपुरवठा खंडित झाला होता. एकीकडे पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली, तर दुसरीकडे त्याच वेळेस वीज नसल्याने नागरिकांची तारांबळ झाल्याचे चित्र शहरात दिसून आले. पर्वती उपकेंद्रात झाड पडल्याने आणि प्रयेजा- मधुकोश वाहिनीच्या फिडर बॉक्समध्ये पाणी साचल्याने दुरुस्ती कामात अडथळे येत आहेत. बंडगार्डन विभागातील वडाचीवाडी येथे झाडाच्या फांद्या पडल्याने वीज खंडित झाली झाली. रास्ता पेठ, कोंढवा आणि येवलेवाडी भागातील अतिउच्चदाब वाहिन्यांवरही परिणाम झाला आहे. पिंपरी-चिंचवड आणि भोसरी परिसरातही परिस्थिती गंभीर असून, रावेत येथील २२ केव्ही वाहिनी खंडित झाल्याने तब्बल ५८ रोहित्रे बंद पडली आहेत. महावितरणचे सहकार्याचे आवाहन पाऊस थांबल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी तांत्रिक बिघाड शोधण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे निर्माण झालेली ही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता वीज ग्राहकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. अनेक भागांत पर्यायी यंत्रणेद्वारे वीजपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी पूर्ण दुरुस्तीसाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.