pune Rain: पावसाची जोरदार हजेरी
pune Rain: शहरासह उपनगरांमध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी (दि. १ नोव्हेंबर) पहाटेच पावसाने जोरदार हजेरी लावली.

कमाल तापमानात घट; पारा ३३ अंशांपर्यंत खाली
pune Rain: शहरासह उपनगरांमध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी (दि. १ नोव्हेंबर) पहाटेच पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे पुणेकरांना रविवारी सूर्यनारायणाचे दर्शन उशिरा झाले.
शहराच्या मध्यवर्ती भागासह कोथरूड, पाषाण, खडकवासला, धायरी, सिंहगड रस्ता, हडपसर, कात्रज, आंबेगाव, वारजे, औंध, येरवडा आणि विश्रांतवाडी या उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. याशिवाय पिंपरी- चिंचवड आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागातही कमी- अधिक प्रमाणात पाऊस झाला.
हवामान विभागाने दिलेल्या नोंदीनुसार, उपनगरातील एनडीए परिसरात सकाळी ३ मिमी पावसाची नोंद झाली, तर शिरूर व आंबेगाव परिसरात २ ते ३ मिमी, पाषाण, माळीण आणि भोर परिसरात प्रत्येकी १ मिमी पावसाची नोंद झाली.
पहाटेच्या पावसानंतर दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते, तर अधूनमधून उन्हाचे हलकेसे चटकेही जाणवत होते. या बदललेल्या हवामानामुळे पुणेकरांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांत ३६ अंशांपर्यंत पोहोचलेला उष्णतेचा पारा आता ३३ अंशांपर्यंत खाली आला असून कमाल तापमानात घट झाली आहे. हवेतील या गारव्यामुळे सध्या रात्री आणि पहाटेच्या वेळी पुणेकरांना थंडीचा अनुभव येत आहे.
त्यामुळे यंदा ऐन दिवाळीच्या सणातच पुणेकरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात आकाश ढगाळ राहणार असून, पावसाच्या एक ते दोन हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.





