Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानक होणार भिक्षेकरीमुक्त! पोलिसांची मोठी मोहीम; २ महिन्यांत ६० जणांवर कारवाई
Pune Railway Station : स्वयंसेवी संस्थांकडून होणाऱ्या अन्नदानामुळे रेल्वे स्थानक आणि ससून परिसरात वाढली होती भिक्षेकऱ्यांची गर्दी; समुपदेशनानंतर पोलिसांनी उचलले कठोर पाऊल.

Pune Railway Station – गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील रेल्वे, बस स्थानकावरील भिक्षेकरी, बेघर आणि गर्दुल्यांचा वाढता वावर प्रवासी तसेच प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत होता. विशेषतः पुणे रेल्वे स्थानक परिसरात तर काहीजणांनी तेथे कायमस्वरूपी ठाण मांडले होते. परिणामी, प्रवाशांना अस्वच्छता, गैरसोय आणि सुरक्षेच्या धोक्यांना सामोरे जावे लागत होते. आता रेल्वे पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेमुळे या परिस्थितीत लक्षणीय बदल घडत आहे.
रेल्वे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रेल्वे स्थानक परिसरातील वाढते अतिक्रमण, भिक्षेकरी आणि गुन्हेगारी व्यक्तींच्या वावरावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांनी विशेष मोहीम राबवत रेल्वे स्थानक आणि परिसरात वावरणाऱ्या भिक्षेकऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली. मोहिमेदरम्यान समुपदेशन करूनही जागा न सोडणाऱ्या भिक्षेकऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करून भिक्षेकरी सेवा केंद्रांमध्ये पाठविले. गेल्या दोन महिन्यांत तब्बल ६० जणांवर कारवाई केली आहे.
अन्नदानामुळे गर्दी-
पुणे रेल्वे स्थानक, ससून रुग्णालय आणि आसपासच्या परिसरात स्वयंसेवी संस्था अन्नदान करतात. मानवतेच्या भावनेतून दररोज सकाळ-संध्याकाळ मोफत जेवण दिले जाते. यामुळे अनेक भिक्षेकरी, बेघर याच परिसरात कायमस्वरूपी वास्तव्यास राहत आहेत. बस स्थानकांमध्ये सुरक्षा रक्षकांकडून अशा व्यक्तींना प्रवेश नाकारला जात असल्याने भिक्षेकरी मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकाकडे वळतात. परिणामी, १०० हून अधिक भिक्षेकरी रेल्वे स्थानकात वावरत असतात. यामध्ये काही परराज्यातील व्यक्ती तसेच अमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तींचाही समावेश होता.
सीसीटीव्ही जाळे वाढविणार–
रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी अनेक अनधिकृत मार्ग असल्याने भिक्षेकऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने अनधिकृत मार्गांवर बंदोबस्त ठेवला आहे. तसेच फलाटांव्यतिरिक्त परिसरातील दुर्गम भागांतही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. या उपाययोजनांमुळे संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे झाले असून, भिक्षेकरी, गर्दुल्यांच्या अनधिकृत वावरावरही मोठ्या प्रमाणात अंकुश बसला आहे.






