Pune Railway Station : पुणे स्टेशनवर ४ नवीन लिफ्ट सुरू! आता जिने चढण्याचं टेन्शन मिटलं; पाहा काय बदललं?
Pune Railway Station : दीड लाख प्रवाशांच्या दैनंदिन गर्दीला मिळणार सुखद अनुभव; पादचारी पुलाजवळ अत्याधुनिक ४ लिफ्ट प्रवाशांच्या सेवेत रुजू.

Pune Railway Station – प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेल्या चार नवीन लिफ्ट सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना फलाटवर ये-जा करणे आता अधिक सोयीचे झाले आहे. मध्य रेल्वे विभागातील पुणे स्टेशन हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.
या ठिकाणावरून दररोज २०० हून रेल्वे गाड्या धावतात. तसेच, दैनंदिन दीड लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे स्थानकावर कायम प्रवाशांची वर्दळ असते. आता उन्हाळा सुरू होत असल्याने प्रवाशांच्या गर्दीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे स्टेशनवरून राज्यातील कोनाकोपऱ्यासह अन्य राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते.
या गर्दीत बॅग घेऊन प्रवाशांना जिन्यानेच चढ-उतार करावा लागत होता. मोठ्या बॅगा, लहान मुले किंवा आरोग्याच्या अडचणी असलेल्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत होत्या. अनेक वेळा महिला आणि ज्येष्ठांना जिने चढताना अडचणी येत होत्या. त्यामुळे स्थानकावर लिफ्टची सुविधा असावी, अशी मागणी प्रवाशांसाकडून वारंवार करण्यात येत होती.
त्यानुसार पुणे रेल्वे स्थानकावर लिफ्ट बसविण्यास मान्यता देत निधी देण्यात आला. आता या चार नवीन लिफ्ट फलाट क्रमांक १ ते ६ दरम्यान असलेल्या पादचारी पुलांजवळ बसविण्यात आल्या आहेत. आता लिफ्टमुळे काही मिनिटांत सुरक्षितपणे आणि सहजपणे फलाटवर पोहोचणे शक्य झाले आहे.
या लिफ्ट अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविले असून त्यामध्ये सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन अलार्म आणि सीसीटीव्ही देखरेख व्यवस्था बसविण्यात आली आहे. नियमित देखभाल आणि स्वच्छतेसाठीही विशेष पथक नेमण्यात आले आहे. नवीन लिफ्टमुळे पुणे रेल्वे स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
“स्थानकावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या एका फलाटवरून दुसऱ्या फलाटवर जाणे सोयीचे व्हावे यासाठी प्रत्येक फलाटच्या जिन्याशेजारी लिफ्ट उभारण्यात आले आहे. गर्दीच्या काळात ज्येष्ठ नागरिक, महिला यांना ये-जा करण्यास सोयीचे होणार आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या लिफ्टचा वापर करावा.”
– हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे





