प्रभात वृत्तसेवा पुणे – ख्रिसमस आणि हिवाळी हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेकडून पुणे – सांगानेर आणि पुणे – नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाडी क्रमांक ०१४०५/०१४०६ पुणे – सांगानेर – पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या सहा फेऱ्या, तर गाडी क्रमांक ०१४०१ / ०१४०२ पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष गाडीच्या ६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. पुणे – सांगानेर विशेष गाडी दि. १९, २६ डिसेंबर आणि २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सांगानेर (एसएनजीएन) येथे पोहोचेल.ट्रेन क्रमांक ०१४०६ सांगानेर- पुणे स्पेशल दि. २०, २७ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी सांगानेर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीला लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, कमान रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, अंकलेश्वर, वडोदरा, गोध्रा, रतलाम, नागदा, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा आणि सवाई माधोपूर येथे थांबा असेल.गाडी क्रमांक ०१४०१ पुणे – नागपूर विशेष गाडी दि. १९, २६ डिसेंबर आणि २ जानेवारी रोजी पुण्याहून रात्री साडेआठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४०२ नागपूर – पुणे विशेष गाडी दि. दि. २०, २७ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी नागपूरहून दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे.